आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकलेला मी पाहिला; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- माझं बालपण भिंगारमध्ये गेलं. जन्म तिथलाच. छावणी मंडळाच्या शाळेत काही काळ शिकलो. देश स्वतंत्र झाला, तेव्हा नगरच्या किल्ल्यावर मोठ्या डौलाने तिरंगा फडकला. खंदकाबाहेर जमलेल्यांमध्ये मीही होतो, अशी आठवण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितली. 


नगरच्या पर्यटनविकासासाठी प्रयत्नशील असलेल्या 'स्वागत अहमदनगर'च्या वतीने चित्रकार योगेश हराळे, चित्र-शिल्पकार बालाजी वल्लाल, दुर्गप्रेमी ठाकूरदास परदेशी, वस्तू संग्राहक पंकज मेहेर आदींनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णांशी संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते अॅड. श्याम आसावा यांनी त्यांना 'स्वागत अहमदगर'च्या उपक्रमांची माहिती दिली. हराळे यांनी मेहेराबाद येथील अवतार मेहेरबाबांच्या समाधीचे चित्र, तर वल्लाल यांनी नगरच्या किल्ल्याच्या फत्ते बुरुजाचे शिल्प अण्णांना भेट दिले. ते पाहून अण्णांना आपले बालपण आठवले. लहानपणी भिंगारमध्ये असताना किल्ला हे आम्हा मुलांसाठी मोठे आकर्षण होते. स्वातंत्र्य लढा तेव्हा सुरू होता. 

 

भिंगार हे क्रांतिकारकांचे केंद्र होते. त्या रोमहर्षक हकिकती आम्ही ऐकायचो. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे राष्ट्रीय नेते १९४२ च्या लढ्यात नगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध होते. देश स्वतंत्र झाला, तेव्हा याच राष्ट्रीय नेत्यांपैकी आचार्य नरेंद्र देव व नगरचे सुपुत्र देशभक्त रावसाहेब पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ल्याच्या ९ क्रमांकाच्या फत्ते बुरुजावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा तिरंगा फडकला. हा क्षण प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले, असे अण्णांनी सांगितले. 'स्वागत अहमदनगर'च्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे अण्णांनी कौतुक केले. नगरचा किल्ला हे राष्ट्रासाठी प्रेरणास्थान असून त्याच्या जतन व विकासाच्या कामाला चालना मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...