आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'निर्भया'च्या आईच्या आक्रोशाने सर्वांच्याच डोळ्यात पाणी; कोपर्डीत 'निर्भया'ला सामुदायिक श्रद्धांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपर्डी- अत्याचार करणाऱ्या नराधमांना ज्या दिवशी फासावर लटकताना पाहीन, त्या दिवशी माझ्या मनाला आणि मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, असे म्हणत आक्रोश करणाऱ्या निर्भयाच्या आईला पाहून उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणवले. 


कोपर्डीच्या घटनेला शुक्रवारी दोन वर्षे पूर्ण झाली. सकाळी १० वाजता निर्भयाच्या स्मृतिस्थळी कुटुंबीयांसह ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 


दोन वर्षापूर्वी १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. निर्भयाच्या स्मृतिस्थळी कुटुंबीयांनी माउली महाराज पठाडे यांचे कीर्तन आयोजित केले होते. स्री भ्रूणहत्येला विरोध होणे आवश्यक आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे करणे आवश्यक असून त्यांची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे, असे माउली महाराजांनी सांगितले. कीर्तन झाल्यानंतर कुटुंबीय, ग्रामस्थ, सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड,छावा संघटना यांच्यासह राज्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निर्भयाला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आईच्या आक्रोशाने उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. माजी जि. प. अध्यक्ष मंजूषा गुंड, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस, आबा पाटील, रमेश कोरे, संजय सावंत,स्वाती सपाटे, मधुकर राळेभात, विक्रम शेळके आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब साळुंके, राजेंद्र फाळके, काकासाहेब तापकिर, नीलेश तनपुरे, राहुल नवले, नानासाहेब जावले, सुनील नागणे, महेश डोंगरे, लालासाहेब सुद्रिक, झुंबर सुद्रिक, सरपंच रोहिणी सुद्रिक आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. संभाजी ब्रिगेडतर्फे टाकळी खंडेश्वरी येथील हरिओम बालगृहातील गरीब व गरजू विद्यार्थिंनीना टिळक भोस यांच्या हस्ते कपड्यांचे वाटप केले. यावेळी फारूक बेग आणि दुर्गा काळे, स्मिता सोनवणे या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 


नूतन माध्यमिक विद्यालयात श्रद्धांजली 
कुळधरण येथील नूतन माध्यमिक विद्यालयात निर्भया शिकत होती. या विद्यालयात तिला साश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तिचे अध्यापक शरद जगताप यांनी तिच्या खो खो खेळातील कौशल्याच्या आठवणी सांगितल्या. श्रद्धांजलीच्या पार्श्वभूमीवर कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्डीत पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्यासह १२ पोलिस अधिकारी, राज्य राखीव दलाच्या ३ तुकड्या, महिला राज्य राखीव दलासह ८० महिला आणि पुरुष पोलिस कर्मचारी तैनात होते. 

बातम्या आणखी आहेत...