आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...मग शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर काय कारवाई कराल? धनंजय मुंडेंचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- हजारो कोटी बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी संबोधले तर सरकारकडून कारवाईची धमकी येते, मग अहमदनगर भाजप उपमहापौराने आमचे दैवत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावर काय कारवाई करणार? असा संतप्त  सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर करत त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोपही मुंडेंनी यावेळी केला.

 

उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अकोले व कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते. मुंडे यांनी सरकारवर आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ.. अशी जाहीरातबाजी करत सत्ता मिळवलेला भाजप पक्ष हा फक्त सत्तेसाठी महाराजांच्या नावाचा वापर करतो आहे. पण भाजपच्या ओठावर एक आणि पोटात एक आहे. त्यामुळेच भाजपचे लोक वारंवार शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करत असल्याचा आरोप मुंडेंनी केला.

सरकारविरोधात बोलणाऱ्यांना नोटीसा बजावणारे भाजप सरकार आता श्रीपाद छिंदम यांच्यावर काय काय कारवाई करणार? हे आता महाराष्ट्र पाहातोय, असेही ते म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल अपशब्द काढलेला उपमहापौर श्रीपाद छिंदंम हा राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय पदवीचा कार्यकर्ता आहे. म्हणजे यावरूनच शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रीय सेवा संघाचे विचार काय आहेत, हे समजते असा हल्लाबोल त्यांनी केला. राजीनामा, निलंबन करून भागणार नाही तर महाराजांबद्दल वाईट बोलणारी प्रवृत्ती संपली पाहिजे, असेही मुंडे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...