आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे खासदार दिलीप गांधींसह त्यांचे पुत्र सुवेंद्र यांच्याविरुद्ध खंडणी,अपहरणाचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरमधील फोर्ड शोरूमचे संचालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अखेर शनिवारी भारतीय जनता पक्षाचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिलेल्या निर्देशानुसार   एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बिहाणी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खा. दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्या विरोधात २४ तासांच्या आत गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी दिले होते.

 

काय आहे हे प्रकरण?
खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्याकडून 2015 मध्ये कालावधीत फोर्ड कंपनीची इंडेव्हर गाडी खरेदी केली. हवा तो क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी गाडीची उशिरा नोंदणी केली. त्या दरम्यान, गाडीबाबत तक्रारी केल्या. २९ सप्टेंबर २०१५ रोजी सुवेंद्र गांधी, सचिन गायकवाड, पवन गांधी व इतर लोकांनी शोरूमचे मॅनेजर व सेल्स मॅनेजर यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करून खंडणीची मागणी करण्यात आली. त्यावेळी संबंधितांनी शोरूममधून दहा इको स्पोर्ट्स गाड्याही नेल्या होत्या. त्यातील नऊच परत करण्यात आल्या, अशी त्यांची तक्रार आहे.

 

बिहाणी यांची थेट ‘पीएमओे’कडे तक्रार
बिहाणी यांनी भीतीमुळे गांधींविरोधात लवकर तक्रार केली नाही. नंतर 10 ऑक्टोबर 2016 रोजी थेट पंतप्रधानांकडे तक्रार अर्ज पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो पुढील कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. पण त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर बिहाणी यांनी 2017 मध्ये हायकोर्टात राज्य सरकार, पोलिस अधीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे व पोलिस महानिरीक्षक यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...