आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन; प्राध्यापकाची धुलाई, कान्हूर पठारमधील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाकळी ढोकेश्वर - पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यामंदिरात १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीशी प्राध्यापकाने असभ्य वर्तन केले. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यावर या महाशयांची शाळेमध्येच चांगली धुलाई करण्यात आली. टाकळी ढोकेश्वर येथील राहत्या घरीही या प्राध्यापकाला पत्नीसमोर चोप देण्यात आला.

 

या प्राध्यापकाने नंतर संबंधित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या निरीक्षकांच्या गावातील शाळेत हा प्रकार घडला. तथापि, तीन दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई या लंपट प्राध्यापकावर करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शाळेतील ही दुसरी घटना असल्याने कडक कारवाईची मागणी पालकवर्गातून होत आहे.

 

कान्हूर पठार येथील जनता विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांची तीन दिवसांपूर्वी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा होती. पेपर अवघड गेल्याची कल्पना या विद्यार्थिनीने प्राध्यापकाला दिली असता 'तू चिंता करू नकोस, मी तुला पास करतो', असे म्हणून त्याने असभ्य वर्तन केले. या विद्यार्थिनीने रडतरडत ही हकिकत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर जाब विचारत या प्राध्यापकाची यथेच्छ धुलाई करण्यात आली. याअगोदर याच विद्यालयात मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका शिक्षकाला मारहाण करण्यात आली होती.

 

चौकशीअंती कारवाई
झालेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे रयत शिक्षण संस्थेचे विभागीय निरीक्षक एस. पी. ठुबे यांनी सांगितले. उत्तर विभागीय कार्यालयाकडे अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, शालेय शिक्षण समितीने या प्राध्यापकावर कोणतीही कारवाई किंवा आक्षेप न नोंदवल्याने पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...