आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर- गेल्या काही दिवसापासून केरळमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. पूरग्रस्त परिस्थितीत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशातील अनेक जण सरसावले आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील देहविक्री करणार्या महिलांचाही समावेश आहे. या महिलांनी पूरग्रस्ताना 21 हजार रुपयांची मदत दिली आहे. एवढेच नाही तर महिन्याच्या शेवटी या महिला एक लाख रुपये पूरग्रस्तांसाठी पाठवणार आहेत.
एनजीओ 'स्नेहालय'चे दीपक बुराम यांनी सांगितले की, देहविक्री करणार्या महिलांच्या एका समुहाने केरळमधील पूरग्रस्तांसाठी प्रतप्रधान मदत निधीच्या नावाने 21 हजार रुपयांचा धनादेश उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पूरग्रस्तांसाठी महिन्याच्या शेवटी या महिला आणखी एक लाख रुपये पाठवणार आहेत.
देशातील विविध भागात आलेल्या नैसर्गिक संकटात अडकलेल्या नागरिकांसाठी यापूर्वी या महिलांनी मदत केली होती, असे दीपक बुराम यांनी सांगितले आहे. डिसेंबर 2015 मध्ये चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी या महिलांनी एक लाख रुपयांची मदत केली होती. याशिवाय गुजरातमधील भूकंप (2001), त्सुनामी (2004), काश्मीर आणि बिहारमधील पूरस्थिती, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तसेच कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत, अशा विविध कार्यात देहविक्री करणार्या महिलांनी 27 लाख रुपयांचे योगदान दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.