आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द; श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा अहमदनगरचा भाजप उपमहापाैर श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल (शुक्रवार) त्याला अटक करण्यात अाली होती. तडीपारीची नाेटीस व अनेक गुन्हे दाखल असतानाही महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर पक्षात घेऊन त्याला थेट उपमहापाैरपद देणाऱ्या भाजपवर अाता त्याला पदच्युत करण्याची व पक्षातून हकालपट्टी करण्याची नामुष्की अाेढवली आहे.

 

छिंदमच्या वक्तव्याची अाॅडिअाे क्लीप व्हायरल झाल्यानंतर संतप्त जमावाने त्याच्या हाॅटेलची, कार्यालयाची ताेडफाेड केली. इतर शहरातही पडसाद उमटले. अाैरंगाबादेत भाजप कार्यालयावर दगडफेक झाली. तर छिंदमचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय नगरच्या बार असाेसिएशनने घेतला.

छिंदमच्या बेताल वक्तव्याची माहिती कळताच त्याच्या संपर्क कार्यालय व घरासमोर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. त्यांनी घाेषणाबाजी करत कार्यालयाची, गाड्यांची तोडफोड केली.  तणाव वाढत असताना पाेलिसांचे पथक घटनास्थळी अाले. त्यांनी ताेडफाेड करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांना पोलिसांनी अटक केली, तर इतर जमाव पळून गेला. शिवसेनेचे माजी अामदार अनिल राठाेडही  शिवसैनिकांसह अाले, त्यांनी छिंदमच्या अटकेची मागणी केली.  मनपा कर्मचारी युनियननेही निषेध केला. दरम्यान, ताेफखाना पाेलिसांनी छिंदमविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

 

तत्पूर्वी छिंंदम व भाजपविराेधात तीव्र राेष वाढत असल्याची दखल घेऊन भाजपचे स्थानिक खासदार दिलीप गांधी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन छिंदम याच्याकडून उपमहापाैरपदाचा राजीनामा घेतल्याचे व त्याची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.


जिल्ह्यात तीव्र पडसाद, पाथर्डीत बंदला हिंसक वळण

छिंदमच्या या वक्तव्याचे नगर शहरासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. पाथर्डीत बंद पाळण्यात अाला, अज्ञात जमावाने दगडफेक करून दोन एसटी बसच्या काचा फोडल्या. छिंदमविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. श्रीगाेंद्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना व शिवप्रेमी संघटनांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. शिर्डीत नगर-मनमाड रस्त्यावर तासभर ‘रास्ता रोको’ करून छिंदमच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कर्जतमध्येही तीव्र निषेध करण्यात अाला.

 

प्रकरण काय?
अापल्या प्रभागातील एका कामासाठी छिंदमने मनपाच्या बांधकाम विभागाकडे कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. मात्र ते पाठवण्यात अाले नाही. त्यामुळे छिंदमने सकाळी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन करून याबाबत जाब विचारला. त्यावर ‘शिवजयंतीच्या कार्यक्रमात कर्मचारी अडकले आहेत, हा कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना पाठवतो,’ असे बिडवे यांनी त्याला सांगितले. त्यावर छिंदमने अत्यंत हीन भाषेत शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. त्याविराेधात प्रचंड उद्रेक हाेताच ताळ्यावर अालेल्या छिंदमने नंतर जाहीर माफीही मागितली.

 

छिंदमविरुद्ध अनेक गुन्हे, तडीपारीचीही नोटीस

काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता असताना छिंदमवर अनेक गुन्हे दाखल झाले अाहेत. विनयभंग, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगणे अादी गुन्ह्यांची त्याच्याविराेधात विविध पाेलिस ठाण्यात नाेंद अाहे. गुन्ह्यांची व्याप्ती वाढल्यामुळे निवडणुकीच्या काळातच त्याच्याविराेधात तडीपारीची नाेटीसही बजावण्यात अाली हाेती, मात्र नंतर ती मागे घेण्यात अाली. 

 

भाजपचा खरा चेहरा समोर आला
छिंदमने शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान केला आहे. छत्रपतींच्या नावाने मते मिळवायची आणि प्रत्यक्षात वेगळाच चेहराच दाखवयाचा. भाजपला शिवाजी महाराजांविषयी प्रेम नाहीच. यानिमित्ताने त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.
- डॉ. सुधीर तांबे, आमदार.

 

औरंगाबादेतही उस्मानपुरा येथील भाजप कार्यालय फोडले..

नगर येथील घटनेचे औरंगाबादेत तीव्र पडसाद उमटले आहेत. मराठा  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाद छिंदम यांच्या फोटोला जोडे मारले. तसेच भाजपचे उस्मानपुरा येथील कार्यालय जमावाने फोडल्याची माहिती मिळाली आहे.

 

कोण आहे श्रीपाद छिंदम? 

श्रीपाद छिंदम हे आधी काँग्रेसमध्ये होते. ते गुंड प्रवृत्तीचे आहे. प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या छिंदम यांच्यावर विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याची धमकी देणे, असे गुन्हे दाखल आहेत. ऐन निवडणुकीत त्याच्या विरोधात तडीपारीची नोटीस निघाली होती.

 

छिंदम यांचा माफिनामा...

भाजपने हकालपट्टी केल्यानंतर श्रीपाद छिंदम यांना चूक लक्षात आली आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्‍ट्राची माफी मागीतली आहे. शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल छिंदम यांनी जनतेची हात जोडून माफी मागितली आहे.

 

छिंदम यांच्या कार्यालयाची तोडफोड..
छिंदम यांच्या कार्यालयाची शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या कार्याकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.... श्रीपाद चिंदम यांचे शिवाजी महाराज आणि शिवजयंतीबद्दल केलेलेळ आक्षेपार्ह वक्तव्य आणि घरावर दगडफेकीचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...