आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनमित्र प्रतिष्ठानने संगमनेरकरांचे वाचवले एक कोटी वीस लाख...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- स्वस्त दरातील वह्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उपलब्ध करणाऱ्या जनमित्र प्रतिष्ठानच्या उपक्रमाला चौथ्या वर्षीही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानने संगमनेरकरांचे तब्बल एक कोटी वीस लाख रुपये वाचवल्याची माहिती अध्यक्ष राजेश चौधरी यांनी दिली. 


जनमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून नामांकित कंपन्यांच्या वह्यांची 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर विक्री सुरू आहे. सर्व प्रथम जनमित्रने हा उपक्रम संगमनेरमध्ये सुरू केला. पहिल्या वर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे संगमनेरमधील वह्या विक्रेत्यांनादेखील सवलतीच्या दरात वह्यांची विक्री करावी लागली. त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला. जूनमध्ये शाळा, महाविद्यालयांचे वर्ग सुरू होतात. त्यामुळे वह्या व शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची बाजारात गर्दी होते. वह्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता पालकांवर मोठा आर्थिक भार पडत होता. आधीच विविध खर्चाने मेटाकुटीला आलेल्या पालकांचा खिसा अक्षरश: रिकामा होत असे. 


जनमित्रने शैक्षणिक खर्चाचा विचार करत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वह्या विक्रीचा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीच्या वह्या वीस ते पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. वह्या विक्रेत्यांना पहिल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला. नंतरच्या वर्षापासून त्यांनीदेखील सवलतीच्या दरात वह्या विक्री करत विद्यार्थी, पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. जनमित्रच्या उपक्रमाची लोकप्रियता वाढल्याने त्यांच्याकडील वह्यांच्या विक्रीतदेखील दरवर्षी वाढ होत आहे. 


नुकत्याच झालेल्या एका नामांकित कंपनीच्या सर्व्हेत एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये सरासरी चार कोटींची वह्यांची विक्री होत असल्याचे पुढे आले. सवलतीच्या दरात वह्या उपलब्ध करून देत जनमित्रने ग्राहक आणि पालकांचे १ कोटी २० लाख रुपये आतापर्यंत वाचवले असल्याचे चौधरी यांनी सांगितले. 


पंतप्रधानांनी घेतली उपक्रमाची दखल 
ना नफा ना तोटा तत्त्वावर संगमनेर येथील जनमित्र प्रतिष्ठानने चार वर्षांपूर्वी २० ते ५० टक्के सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करुन दिल्या. पहिल्याच वर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. वह्यांमध्ये मोठी सवलत दिली जात असल्याने पालकांत समाधानाचे वातावरण आहे. आमच्या उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली. आता तर स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुध्दा याच धर्तीवर वह्या विक्रीची केंद्रे उघडली आहेत.
- राजेश चौधरी, अध्यक्ष, जनमित्र प्रतिष्ठान, संगमनेर. 

बातम्या आणखी आहेत...