आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगार नाल्यात फुलवले नंदनवन, स्वखर्चाने बनवला जॉगिंग ट्रॅक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील ओढे-नाले व सीना नदीपात्रातील अतिक्रमणांचा प्रश्न सध्या ऐरणीवर अाला आहे. प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक गणेश भोसले यांनी मात्र एका नाल्याभोवती वृक्ष लागवड करत चक्क नंदनवन फुलवले आहे. भिंगार नाल्याच्या गाळपेर क्षेत्रात त्यांनी नागरिकांसाठी स्वखर्चाने जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. एकेकाळी हगणदारी असलेल्या या भागात शेकडो नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येतात. 


भिंगारहून वहात येणारा नाला बुरूडगाव रस्त्यावरील व्हिडिओकॉन कंपनी व वाकोडी रस्ता परिसरातून पुढे जातो. नाल्याभोवती वेड्याबाभळींचे साम्राज्य होते. आजूबाजूला राहणारे लोक या परिसराचा हगणदारी म्हणून वापर करत. वृक्षप्रेमी नगरसेवक भोसले यांनी या परिसराचा अवघ्या तीन वर्षांत कायापालट केला. नाल्याभोवती असलेल्या बाभळी काढून परिसर स्वच्छता करण्यात आला. त्यानंतर नाल्याभोवती समांतर पध्दतीने वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. त्यात मोगरा, पारिजातक, सदाफुली, रातराणीचा समावेश आहे. सावली मिळावी, यासाठी वडाची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. तीन वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे आता वृक्षांत रुपांतर झाले आहे. 


हा परिसर सुशोभित करण्यासाठी भोसले यांनी महापालिकेकडून एक रुपयादेखील घेतला नाही. अडगळीत पडलेले पथदिवे, खेळणी, पेव्हींग ब्लॉक, तसेच तुटलेल्या बाकांची दुरूस्ती करत ते नाल्याभोवती बसवण्यात अाले. झाडांना पाणी देण्यासाठी स्वखर्चाने कूपनलिका घेऊन पंप बसवला. झाडे व साहित्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक केली. हा परिसर झाडे, फुले, खेळणी, तसेच दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला आहे. एकेकाळी जेथे हगणदारी होती, तेथे आज परिसरातील शेकडो लोक सकाळी व सायंकाळी फिरायला येतात. 
 


दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू 
प्रभागातून भिंगार नाला गेला आहे. त्याच्याभोवती बाभळींचे साम्राज्य होते. हा सर्व परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील काम यशस्वी झाले. दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरूवात करण्यात आली आहे. नाल्याभोवती टप्प्याटप्प्याने सुशोभिकरण करण्यात येणार आहे. नाल्याभोवतीच्या सर्व गाळपेर क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
- गणेश भोसले, नगरसेवक. 


वृक्षांनी बहरलेला एकमेव प्रभाग 
नगरसेवक भोसले हे गेल्या दहा वर्षांपासून प्रभागात वृक्ष लागवड करत आहेत. दरवर्षी िकमान ५० वृक्षांची लागवड करत त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्यासह प्रभागातील नागरिक घेतात. लावलेले एकही रोप वाया जाणार नाही. गेलेच तर त्या ठिकाणी लगेच दुसरे रोप लावण्यात येते. त्यामुळे लावलेल्या प्रत्येक रोपाचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. या वृक्षांना पाणी देण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी नगरसेवक भोसले यांनी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...