आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
ज्योती शिरसाठ हिला काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरच्या लोकांनी प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी दुपारी प्रसुती शस्त्रक्रिया हाेऊन तिने मुलाला जन्म दिला. पण अतिरक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. तिच्याबरोबर असलेल्या आईने डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे मदतीची याचना केली. ज्योतीदेखील अत्यावश्यक मदतीची याचना करत होती. मात्र, अखेरपर्यंत तिला ही मदत मिळाली नाही. बाळही नाजूक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा ज्योती दगावल्याचे नातेवाईकांना समजले.
तब्बल चार तासांहून अधिक कालावधी "ज्योती'ने वेदनांशी झुंज दिली. पण शेवटी बाळाचे तोंडही न पाहताच तिने अखेरचा श्वास घेतला. ही बाब नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी आक्रोश केला. त्यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांनी तत्काळ तिचा मृतदेह घरी नेऊन अंत्यविधी करण्याचा सल्ला दिला. तथापि, रुग्णालयाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणण्यासाठी नातेवाईकांनी शवविच्छेदन औरंगाबाद किंवा पुण्याला करण्याची मागणी केली.
सोमवारी रात्रभर ज्योतीचा मृतदेह तसाच पडून होता. मंगळवारी सकाळी सासरच्या लाेकांसह इतर नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली. पण रुग्णालय प्रशासन व पोलिस त्यांना कसलीही समाधानकारक उत्तरे देत नव्हते. ज्योतीचा लहान भाऊ अरुण बडे याने तिचे शवविच्छेदन बाहेर करण्याचा आग्रह धरला. मात्र, प्रशासनाने दबाव टाकून ज्योतीचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयातच केले. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
शवविच्छेदन करण्यापूर्वी पोलिसांनी अरुण बडे, त्याचा एक भाऊ, सासरच्या काही लोकांकडून आपली प्रशासनाविरुद्ध काहीच तक्रार नसल्याचे लिहून घेतले. काही कोऱ्या कागदावर या सर्वांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टापा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इकडे नाजूक अवस्थेत असलेले तिचे बाळ मात्र जिल्हा रुग्णालयातच होते.
गावात वाटले पेढे
ज्योती काही दिवसांपासून बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होती. तिच्यासोबत आई असल्याने घरी लहान भाऊ अरुण होता. दुपारी चार वाजता तिला मुलगा झाल्याची गोड बातमी समजताच त्याने गावात जाऊन मित्रांना व नातेवाईकांना पेढे वाटले. पेढे वाटत असतानाच त्याला ज्योती अत्यवस्थ असल्याचा फोन आला. त्याने तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. तो येईपर्यंत ज्योतीने अखेरचा श्वास घेतला होता.
मजा आली का?
रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ज्योती दगावल्याने तिचा लहान भाऊ नगरमध्ये शवविच्छेदन करायला तयार नव्हता. पण दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी दबाव टाकला. 'ती आता परत येणार आहे का', असे ते म्हणत होते. "नातेवाईक व प्रशासनाच्या दबावापुढे हतबल होत तिचे शवविच्छेदन नगरमध्ये होताना त्याला पहावे लागले. यावेळी "आता आली का मजा?' असे म्हणत शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरने अरुणची क्रूर चेष्टा केली.
यंत्रणेपुढे हतबल
वृद्ध आई-वडील, थोरली विवाहित बहीण व लहान भाऊ अरुण असा परिवार ज्योतीमागे आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने गरिबीत दिवस काढून लहान भावाचे शिक्षण केले. तिने गेली दहा वर्षे रुग्णांची सेवा केली. आणीबाणीच्या परिस्थितीत तिला स्वत:ला मात्र ही सेवा मिळाली नाही.
विश्वास उडाला
कुटुंबासाठी आयुष्यभर हालअपेष्टा सहन करणाऱ्या बहिणीचा विदारक मृत्यू झाला. तिने आयुष्यभर रुग्णांची निरपेक्ष सेवा केली. पण तिच्या वाट्याला मृत्यूनंतरही भयानक उपेक्षा आली. सिव्हिलचा कारभार प्रचंड संतापजनक आहे. माझी बहीण परत येणार नसली, तरी हा क्रूरपणा चव्हाट्यावर आणायचा होता. सामाजिक संघटना व मित्र मदतीला धावले. पण आम्हाला दबावापुढे हतबल व्हावे लागल्याने न्यायावरचा विश्वास उडाला.
- अरुण बडे, ज्याेतीचा भाऊ.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.