आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव दुहेरी हत्याकांड: मारेकऱ्यांची नावे निष्पन्न; हेतू मात्र गुलदस्त्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संदीप गिऱ्हे उर्फ जॉन्टी व महावीर उर्फ पप्पू मोकळ - Divya Marathi
संदीप गिऱ्हे उर्फ जॉन्टी व महावीर उर्फ पप्पू मोकळ

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. संदीप गुंजाळ, संदीप गिऱ्हे, महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळ व आणखी एक अशा चौघांनी मिळून ही हत्या केली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. मृत संजय कोतकर यांना गुंजाळ याने, तर वसंत ठुबे यांना गिऱ्हे याने गोळ्या घातल्या. आरोपींची नावे निष्पन्न झाली असली, तरी गुन्ह्यामागचा हेतू अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, हत्याकांडानंतर आरोपी गुंजाळ याने पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. इतर तीन अारोपी मात्र फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 

संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या केडगाव हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना यश आले. शिवसेना केडगाव शहर उपप्रमुख संजय केशव कोतकर व कार्यकर्ते वसंत आनंदा ठुबे यांची ७ एप्रिलला सायंकाळी ६ च्या सुमारास गोळ्या घालून व गुप्तीने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अवघ्या सहाव्या दिवशी पोलिसांनी आरोपींची नावे निष्पन्न केली आहेत. अटकेतील आरोपी गुंजाळ याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही हत्या एकट्या गुंजाळने केली नसल्याची खात्री पोलिसांना होती. पोलिसी खाक्या दाखवताच गुंजाळ याने सहकारी आरोपींची नावे सांगितली. कोतकर व ठुबे हे दुचाकीवरून जात असताना चौघा अारोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. कोतकर यांच्यावर गुंजाळ याने गोळ्या घालत गुप्तीने वार केला, तर आरोपी गिऱ्हे याने ठुबे यांच्यावर गोळ्या घालत गुप्तीने वार केला. कोतकर व ठुबे खाली पडल्यावर आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. आरोपी पप्पू मोकळ व गिऱ्हे याचा आणखी एक मित्र अशी चौघांनी मिळून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

 

अारोपींची नावे निष्पन्न झाली असली, तरी गुन्ह्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. फरार आरोपी व गुन्ह्यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत. आरोपी गुंजाळ याने सुरूवातीपासून पोलिसांची दिशाभूल केली. सावकारी पैशांच्या वादातून मी एकट्यानेच ही हत्या केली असल्याचे तो पोलिसांना सांगत होता. परंतु पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच गुंजाळने गुन्ह्यातील इतर आरोपींची नावे व घटनाक्रम सांगितला.

 

आरोपी कोणाच्या संपर्कात?
गुन्हा घडण्यापूर्वी व गुन्हा घडल्यानंतर आरोपी गुंजाळ कुणाच्या संपर्कात होता, इतर आरोपींनीदेखील कोणाशी संपर्क केला, याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपींना गावठी कट्टा पुरवणाऱ्या बाबासाहेब केदार यालाही पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपींच्या मुसक्यादेखील लवकरच आवळल्या जातील, अशी माहिती तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी दिली. दरम्यान, आरोपी आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्कात असल्याबाबतचे कोणतेच पुरावे पाेलिसांना मिळालेले नाहीत.

 

गिऱ्हे, मोकळ वाळूतस्कर
गुन्ह्यातील अटकेतील आरोपी संदीप गुंजाळ ऊर्फ डोळसे हा एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण आहे, तर आरोपी संदीप गिऱ्हे व पप्पू मोकळ हे वाळूतस्कर आहेत. केडगाव उपनगरात मोठ्या प्रमाणात वाळू पुरवण्याचे काम ते करतात. संदीप गिऱ्हे याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. शाहूनगर परिसरात वििवध सांस्कृितक कार्यक्रमांतही त्यांचा पुढाकार असतो. मात्र, आता या गुन्ह्यात दोघांची नावे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस दोघांच्या मागावर असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...