आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव पोटनिवडणूक: काँग्रेसचे कोतकर विजयी; भाजपची अनामत जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगावची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या शिवसेनेच्या पदरी निराशा पडली. काँग्रेसचे उमेदवार विशाल कोतकर यांनी शिवसेना उमेदवार विजय पठारे यांचा ४५४ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. भाजपचे महेश सोले यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले जात होते. गड शाबूत राखण्यात काँग्रेसला यश आले.

 

माजी महापौर संदीप कोतकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने केडगावमधील प्रभाग ३२ बची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने केडगावच्या पोटनिवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना, भाजपने उमेदवार रिंगणात उतरवले होते.

 

काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असली, तरी शिवसेना व भाजप स्वबळावरच निवडणूक लढले. आघाडीचे उमेदवार विशाल कोतकर यांना निवडून आणण्यासाठी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, तर शिवसेनेकडून विजय पठारे यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, हर्षवर्धन कोतकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी धडाडल्या. त्यामुळे शिवसेनेचे पठारे व काँग्रेसचे कोतकर यांच्यात चुरस वाढली होती.

 

शुक्रवारी (६ एप्रिल) सुमारे ७५ टक्के मतदान झाले. शनिवारी सकाळी जुन्या महापालिकेत मतमोजणीला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली. यावेळी काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे विशाल कोतकर यांना २ हजार ३४०, शिवसेनेचे विजय पठारे यांना १ हजार ८८६, तर भाजपचे महेश सोले यांना १५६ मते मिळाली. ५० मतदारांनी नकार अधिकार वापरला. मतमोजणीत मोठी चुरस पहायला मिळाली. पहिल्या फेरीत कोण विजयी होणार याचा अंदाज बांधता येणे कठीण होते. दुसऱ्या फेरीत चित्र स्पष्ट झाले.


शिवसेनेचे पठारेही पराभूत
केडगाव पोटनिवडणुकीची शनिवारी जुन्या महापालिकेत मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवार विशाल कोतकर यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.


नंतर कोतकरांची मुसंडी
पहिल्या फेरीत शिवसेनेचे विजय पठारे यांनी १ हजार ३३६ मते घेतली. त्यावेळी विशाल कोतकर १ हजार १६२ मते घेऊन १७४ मतांनी पिछाडीवर होते. दुसऱ्या फेरीत कोतकर यांनी जोरदार मुसंडी घेत १ हजार १७८ मते मिळवली. पठारे दुसऱ्या फेरीत ५५० मते घेऊन पिछाडीवर पडले. अंतिम निकाल हाती आला, त्यावेळी कोतकर यांनी ४५४ मतांनी विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूूमीवर या पोटनिवडणुकीला प्रतिष्ठेचे करण्यात आले होते. कोण बाजी मारणार? याची उत्सुकला अंतिम क्षणापर्यंत लागून होती. या निवडणुकीत भाजपचे महेश सोले यांना पहिल्या फेरीत ८४ तर दुसऱ्या फेरीत २३ मते मिळाली. हा निकाल भाजपसाठी धक्कादायक असल्याने आता चिंतन होणार का?

 

उमेदवारनिहाय मते
विशाल कोतकर (काँग्रेस) - २३४०
विजय पठारे (शिवसेना) - १८८६
महेश सोले (भाजप) - १५६

बातम्या आणखी आहेत...