आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड : आरोपींना हवे साक्षीदारांच्या जबाबासह संपूर्ण दोषारोपपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर शुक्रवारी आरोपींना या दोषारोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्या अपूर्ण असल्याचे सांगत न्यायालयात सीआयडीने दाखल केलेले दोषारोप व आरोपींना दिलेल्या दोषारोपपत्रांच्या प्रतींमध्ये फरक असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे दोषारोपपत्रामध्ये नमूद केलेली सर्व माहिती व तपशील आरोपींना द्यावा, असे तपासी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी २० जुलै रोजी होणार आहे. 


गेल्या आठवड्यात सीआयडीने आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रात नावे असलेल्या आठही आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना दोषारोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या. आरोपींतर्फे त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र व आरोपींच्या वकिलांना मिळालेल्या दोषारोपपत्रात फरक असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच अपूर्ण माहिती मिळण्याची मागणी केली. 


पोलिस व सीआयडी तपासादरम्यान सापडलेल्या सीडी, आरोपींचे, तसेच साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब आरोपींच्या वकिलांना मिळाले नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. सीआयडीने गेल्या शुक्रवारी (६ जुलै) केडगाव दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यात अाधीपासूनच अटकेत असलेल्या दहा आरोपींपैकी आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांची नावे वगळलेली होती. मात्र, त्यांची चौकशी सुरू असल्याचे नमूद केले होते. 


दोषारोपपत्रात नाव नसल्याने जगताप व कोतकर यांना दुसऱ्याच दिवशी जामीन मंजूर झाला. त्यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर काेर्टाने त्याबद्दल सीआयडीला कारणे दाखवा नोटीसही काढली. दोषारोपपत्रात भानुदास एकनाथ कोतकर (वय ६२), संदीप रायचंद गुंजाळ, विद्यमान नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव ऊर्फ बी. एम. कोतकर, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळ यांची नावे आहेत. 


हल्ल्याचे दोषारोपपत्र नाही 
केडगावात शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. त्यांना सोडून देण्याची मागणी करत जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घातला. पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करुन जगताप यांना पळवून नेण्यात आले होते. याप्रकरणी भिंगार कॅम्प ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. 


आमदार जगताप, गिरवले शरण 
केडगाव हत्याकांडाच्या दिवशीच रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला होता. याप्रकरणातील फरार आरोपी आमदार अरुण जगताप व ओंकार गिरवले हे तीन महिन्यांनी शरण आले. भिंगार पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. नंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. 

बातम्या आणखी आहेत...