आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास अखेर सीआयडीकडे वर्ग, विशेष पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास अखेर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून तसा आदेश नगर पोलिसांना बुधवारी रात्री मिळाला. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने महानिरीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावास मंजुरी देत गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली. तपास सीआयडीकडे वर्ग झाल्याने नगर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 


संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास योग्य पध्दतीने होत नसल्याचा आरोप हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. गुन्ह्यातील आरोपी भानुदास कोतकर, आमदार अरुण जगताप व शिवाजी कर्डिले यांना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा अारोपही झाला. फरार आरोपींना तत्काळ अटक करावी, तसेच गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे द्यावा, या मागणीसाठी मृतांच्या कुटुंबीयांनी चार दिवस उपोषण केले. त्यांनी तपासाबाबत नोंदवलेला आक्षेप, तसेच पोलिसांवर होत असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, असा प्रस्ताव पोलिस प्रशासनाने महानिरीक्षकांना पाठवला होता. या प्रस्तावास बुधवारी मंजुरी मिळाली. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली एसआयटी बरखास्त करण्यात आली असून मालेगाव येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली नवीन एसअायटी स्थापन करण्यात आली. मात्र, पोद्दार यांनी तपासाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला. 

बातम्या आणखी आहेत...