आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड Video मध्ये कैद; निनावी लिफाफ्यातील सीडीतून उलगडला हत्येचा घटनाक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्रात तांत्रिक पुराव्यांवर तपासी यंत्रणेने भर दिला आहे. पोलिसांनी वारंवार आवाहन करुनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर येत नव्हते. मात्र, हे दुहेरी हत्याकांड एका व्हिडिओत कैद झाले असून त्याची सीडी पोलिसांना निनावी लिफाफ्यातून मिळाली. 


तीन महिन्यांपूर्वी शाहूनगर परिसरात शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली. याप्रकरणी ३२ जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. काही तासांतच मारेकरी संदीप गुंजाळ स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला. त्याने हत्याकांडाची कबुलीही दिली. त्याच्यासह दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. ३८ दिवसांनंतर तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. 


सुरुवातीला ही हत्या व्यक्तिगत व आर्थिक वादातून झाल्याची चर्चा होती. हत्याकांड फक्त संदीप गुंजाळ यानेच केले, की त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. मात्र, चौकशीमध्ये त्यानेच गोळ्या झाडून व गळे कापून हत्याकांड केल्याचे समोर आले. सहआरोपी पप्पू ऊर्फ महावीर मोकळे व संदीप गिऱ्हे तेथे उपस्थित होते. खून केल्यानंतर गुंजाळ इतर दोघांबरोबर पसार झाल्याचा घटनाक्रम तपासात समोर आला आहे. 


प्रत्यक्षदर्शींना समोर येऊन माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. साक्षीदाराचे नाव गोपनीय राखले जाईल, असेही आश्वासन दिले होते. मात्र, बरेच दिवस कोणीही साक्षीदार समोर आला नाही. तोवर अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी पोलिस करत होते. त्यांच्याकडून मिळत असलेल्या माहितीद्वारे गुन्ह्याचे कारण व इतर आरोपींची नावे समोर येण्यास मदत झाली आहे. 


अशी मिळाली सीडी 
हत्याकांडानंतर काही दिवसांनी पोलिसांकडे एक निनावी लिफाफा आला. त्यामध्ये एक सीडी होती. त्यात केडगाव हत्याकांडाचा प्रकार कैद झाल्याचे दिसून आले. सायबर पोलिसांच्या शाखेने या सीडीची शहानिशा केली असता ती केडगाव हत्याकांडाचीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही सुमारे ७०० एमबी क्षमतेची सीडी पोलिसांनी जप्त केली. भारतीय पुरावा कायदा कलमानुसार ही सीडी पुरावा म्हणून वापरला जाईल. 


काय आहे सीडीत? 
निनावी लिफाफ्यातून मिळालेल्या सीडीमधील व्हिडिओत लाल रंगाच्या हाफ बाह्यांच्या टी शर्ट व एक मिलिटरी जवान परिधान करतात, तशी पँट परिधान केलेला युवक आहे. तो जखमी अवस्थेत खाली पडलेल्या एकाचा धारदार शस्त्राने गळा कापत असल्याचे दिसते. रवी खोल्लमच्या घरासमोर थांबलेल्या व्यक्तीनेच कोतकर व ठुबे यांच्यावर गोळीबार केल्याचे दिसते. सीडीबरोबर एक निनावी पत्रही पोलिसांना मिळाले आहे. 


तांत्रिक पुराव्यांवर भर 
केडगाव दुहेरी हत्याकांडात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांना मिळाले आहेत. मात्र, या हत्याकांडाचे गांभीर्य पाहता त्यांच्यावर दबाव येऊ शकतो किंवा ते न्यायालयात फितूर होऊ शकतात. ही शक्यता गृहित धरून तपासी यंत्रणेने तांत्रिक पुराव्यांवरच अधिक भर दिलेला आहे. दोषारोपपत्रातील घटनाक्रम, त्यावेळी आरोपींचे एकमेकांसोबत झालेले संभाषण, तसेच निनावी सीडीचा पुरावा म्हणून वापर केला आहे. ऐनवेळी पुरावा सादर करता येऊ शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...