आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड : ८६ दिवसांनंतरही कटाच्या तपासाचे गूढ गुलदस्त्यात!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केडगाव उपनगरात झालेल्या हत्याकांडाचे संग्रहित छायाचित्र. - Divya Marathi
केडगाव उपनगरात झालेल्या हत्याकांडाचे संग्रहित छायाचित्र.

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांड घडून ८६ दिवस उलटले असून येत्या दोन-तीन दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेनंतर सीअायडीने या गुन्ह्याचा तपास केला. प्रमुख आरोपींना अटक झाली असली, तरी हत्याकांडाचा कट रचल्याप्रकरणीच्या तपासाचे गूढ अद्याप कायम आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरच हे स्पष्ट येणार असून त्याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 


केडगाव उपनगरातील शाहूनगर परिसरात ७ एप्रिलला सायंकाळी ६ च्या सुमारास संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना घडून ८६ दिवस उलटले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रमुख आरोपींना अटक केली. त्यांची वेळोवेळी चौकशी करून आवश्यक ते पुरावे पोलिसांनी गोळा केले. मात्र, या गुन्ह्यातील कट सिध्द करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले नाही. दरम्यान, पोलिसांच्या तपासाबाबत राजकीय आरोप झाल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ३८ दिवस, तर सीअायडीने आतापर्यंत ४८ दिवस या गुन्ह्याचा तपास केला. गुन्हा दाखल झाल्यापासून ९० िदवसांच्या आत न्यायालयासमोर दोषारोपपत्र दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. आतापर्यंत ८६ दिवस उलटले आहेत. त्यामुळे सीआयडीकडून येत्या दोन-तीन दिवसांत दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. सीआयडीने केलेल्या तपासात काेणत्या नवीन बाबी समोर येणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 


केडगाव हत्याकांडप्रकरणी मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम याच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप, भाजप आमदार शिवाजी कर्डिले, अशोक लांडे खूनप्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर, संदीप काेतकर यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याप्रकरणी भादंवि कलम १२० ब नुसार गुन्हा दाखल आहे. हत्याकांडात संदीप गुंजाळ, संदीप गिऱ्हे, विशाल कोतकर, रवी खोल्लम, पप्पू मोकळे, बाबासाहेब केदार हे प्रमुख अारोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपी गुंजाळ याने स्वत: पोलिसांसमोर हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे.


स्टँडिंग वॉरंट, तरी आरोपी फरार 
केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम यांच्या फिर्यादीनुसार ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, इतर २१ फरार आरोपींच्या विरोधात न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट बजावलेले आहे. त्यातील आरोपी भानुदास कोतकर याला पोलिसांनी अटक केली. मात्र, औदुंबर काेतकर, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन सलीम शेख, विजय एकनाथ कराळे, रमेश तात्याभाऊ कोतकर, शरद रामचंद्र जाधव, दादा बन्सी येणारे, विनाेद शिवाजी लगड, मनोज भाऊ कराळे, मयूर श्याम राऊत, शरद वामन लगड, स्वप्निल पोपट पवार, संकेत शरद लगड, बाबासाहेब बापू कोतकर, राजू देवराम गांगड, अप्पासाहेब नामदेव दिघे, बाबूराव रामभाऊ कराळे, ज्ञानेश्वर यादव कोतकर, वैभव धोंडीराम वाघ हे अजून फराराच आहेत. 


आमदार जगताप ८६ दिवस कोठडीत 
केडगाव दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर जगताप यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ते सध्या औरंगाबाद येथील कारागृहात असून जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही, तोपर्यंत जामीन न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. ते गेल्या ८६ दिवसांपासून तुरूंगात आहेत. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरच त्यांच्या जामिनाबाबत निर्णय होणार आहे. 


सीआयडीसमोर मोठे आव्हान 
घटनेच्या दिवशी मृत कोतकर यांना आरोपी खोल्लम याने फोनवरून मारण्याची धमकी दिली होती. खोल्लमने फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून ते विशाल कोतकरला ऐकवले. विशालने ते सुवर्णा कोतकर यांना ऐकवले. त्यानंतर सुवर्णा यांनी आपल्या सासऱ्याला माहिती दिली. त्याने पोलिसांना कळवण्याबाबत सांगितले, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...