आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड : सुवर्णा कोतकरचा ठावठिकाणा लागेना, आरोपींमध्ये नाव समाविष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- माजी उपमहापौर सुवर्णा संदीप कोतकर यांनी सासरा भानुदास कोतकर व पती माजी महापौर संदीप कोतकर यांच्या सांगण्यावरुन केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केली, ही बाब पोलिस व सीआयडीच्या तपासात निष्पन्न झाली आहे. भानुदास व संदीप कोतकर एका खून प्रकरणात नाशिक जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. हत्याकांड घडले तेव्हा भानुदास वैद्यकीय रजेवर बाहेर आलेला होता. सुवर्णा कोतकरचे नाव निष्पन्न होताच त्या फरार झाल्या. पोलिसांना किंवा सीआयडीला त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. 


तीन महिन्यांपूर्वी केडगावातील शाहूनगर परिसरात शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली. कोतवाली पोलिस ठाण्यात याप्रकरणी ३२ जणांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. ३८ दिवसांनंतर तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. सुवर्णा कोतकर व दोन आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. दोषारोपपत्रात म्हटल्यानुसार केडगावातील महापालिका पोटनिवडणूक निकालानंतर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकरने रवी खोल्लमला फाेनवर शिवीगाळ केली होती. खोल्लमने ही बाब बी. एम. कोतकरला सांगितली. संजयसोबत संवादाची क्लिप ऐकत असताना औदुंबर कोतकरचा फोन आला. याबाबत माहिती दिल्यानंतर औदुंबरने त्यांना सुवर्णा कोतकरच्या घरी यायला सांगितले. त्यानुसार बी. एम. आणि खोल्लम तेथे गेले. तेथे विशाल कोतकर हजर होता. संजयने धमकावल्याची माहिती खोल्लमने दिली. ही बाब सुवर्णा कोतकर यांनी सासरे भानुदास व पती संदीप यांना सांगितली. 


त्यानंतर विशाल कोतकरच्या सांगण्यावरुन आरोपी संदीप गुंजाळ खोल्लमच्या घरी गेला. तेथे संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे काही अंतरावर थांबलेले होते. खोल्लमच्या घरी येत असताना गुंजाळने संजय कोतकरवर गोळीबार केला. त्याचवेळी तेेथून पळून जात असलेल्या वसंत ठुबेचाही पाठलाग करुन गुंजाळने त्याला गोळ्या घातल्या. नंतर शस्त्राने वार करुन त्याला मारले. या घटनाक्रमासह गुन्ह्यात दोषारोप ठेवलेल्या आठ जणांसह संदीप कोतकर, सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकरचा हत्याकांडात सहभाग असल्याचे सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे. 


प्रत्यक्षदर्शी तीन साक्षीदार 
केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते. मारेकरी संदीप गुंजाळ स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला. मात्र, इतर आरोपींना शोधून अटक करावी लागली. हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांना मिळत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या हत्याकांडाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना समोर येण्याचे आवाहन केले होते. त्यांचे नाव गोपनीय ठेवून त्यांना रोख बक्षीसही जाहीर केले होते. दोषारोपपत्रानुसार या हत्याकांडात ३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. 


ते सर्व एकाच ठिकाणी 
हत्याकांडाच्या दिवशी आरोपींचे एकमेकांना झालेले फोनकॉल व तांत्रिक तपासानुसार सुवर्णा कोतकर, बी. एम. कोतकर, नूतन नगरसेवक विशाल कोतकर, औदुंबर कोतकर, रवी खोल्लम हे एकाच ठिकाणी असल्याचा निष्कर्ष तपास पथकाने काढला आहे. याच वेळी सुवर्णा कोतकर यांनी सासरे भानुदास व पती संदीप कोतकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून हत्याकांडाचा कट रचला, असे सीआयडीचे म्हणणे आहे. 


जेलबाहेर येऊन फोनाफोनी 
हत्याकांड घडले, त्या दिवशी सुवर्णा कोतकर यांचे सासरे भानुदास कोतकर व पती संदीप कोतकर यांच्याशी फोनवरुन संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले. भानुदास व संदीप कोतकर हे एका खून प्रकरणात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. भानुदास वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेला होता. तर संदीप कोतकरला त्याच दिवशी नाशिकहून धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात नेले जात होते. त्यावेळीच त्यांचा संपर्क झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...