आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड ; आठ जणांविरुद्ध दोषारोपपत्र, सत्र न्यायालयाकडे आज होणार चर्चित खटला वर्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तीन महिन्यांपूर्वी केडगाव उपनगरातील शाहूनगर परिसरात शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी ८ आरोपींविरुद्ध सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी शुक्रवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सध्या हे आठही आरोपी अटकेत आहेत. त्यांच्याविरुद्ध खून करणे, कट रचणे, भारतीय हत्यार कायद्यासह इतर कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर यांच्यावर फौजदारी दंड संहितेच्या कलमानुसार तपास अपूर्ण असल्याचे दोषारोपत्रात नमूद करण्यात आले. 


भानुदास एकनाथ कोतकर, संदीप रायचंद गुंजाळ, विशाल बाळासाहेब कोतकर, रवींद्र रमेश खोलम, बाबासाहेब विठ्ठल केदार, भानुदास महादेव कोतकर, संदीप बाळासाहेब गिर्हे, महावीर रमेश मोकळे यांच्याविरुद्ध खून करणे, खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पुन्हा खून करणे, जमाव गोळा करणे, दंगल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, भारतीय हत्यार कायद्यासह इतर कायदा कलमांन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत. 


नगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत निकालाच्या दिवशी शिवसेना उपशहरप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाला राजकीय पार्श्वभूमी असल्याने तपासाचे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेचे तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रमुख आरोपींना अटक केली. त्यांची वेळोवेळी चौकशी करून आवश्यक ते पुरावे पोलिसांनी गोळा केले. मात्र, कट सिध्द करण्यात अजूनतरी पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, राजकीय आरोप झाल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ३८ दिवस, तर सीअायडीने तब्बल ५० दिवस या तपास केला. शुक्रवारी तब्बल १ हजार ३६६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात अाले. शनिवारी सुनावणीनंतर हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, सत्र न्यायालय या खटल्यात काय निकाल देते याकडे नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. या खटल्यामुळे अनेकांचे भवितव्य ठरणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...