आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड : सीआयडीने न्यायालयासमोर सादर केला लेखी खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणात आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुध्द दोषारोपत्र सादर न केल्याबाबतचा खुलासा सीआयडीने मंगळवारी न्यायालयासमोर सादर केला. दोघांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांच्याविरुध्द दोषारोपपत्र सादर केले नसल्याचे सीआयडीने सादर केलेल्या लेखी खुलाशात म्हटले आहे. 


केडगावातील शाहूनगर परिसरात संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन्ही शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येप्रकरणी अटक झालेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुद्ध सीआयडीने दोषारोपपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र का सादर केले नाही, अशी विचारणा करत न्यायालयाने सीआयडीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण १० आरोपींना अटक केली. त्यापैकी ८ अारोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. परंतु राष्ट्रवादीचे आमदार जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्याविरुद्ध सीआयडीकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे कायदेशीर तरतुदींनुसार त्यांना जामीन मिळाला. 


राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तब्बल ९० दिवस पोलिस कोठडीत होते, तसेच बाळासाहेब कोतकर हाही कोठडीत होता. सीआयडीकडे या गुन्ह्याचा तपास तब्बल ५२ दिवस होता, तरीही त्यांना दोघांविरुद्ध सबळ पुरावे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने सीअायडीच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली. दरम्यान, सीआयडीचे अधिकारी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायालयात हजर झाले. दोघांच्या विरोधात ४२ दिवस तपास करूनही कोणतेच पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द दोषारोपपत्र सादर केले नसल्याचे लेखी म्हणणे सीअायडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडले.

बातम्या आणखी आहेत...