आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी : दिलेली अाश्वासने दोन वर्षांनंतरही अपूर्णच, निर्भयाच्या कुटुंबीयांची परवड चालूच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपर्डीतील त्या घटनेनंतरही पोलिस चौकी बंदच असते. - Divya Marathi
कोपर्डीतील त्या घटनेनंतरही पोलिस चौकी बंदच असते.

कोपर्डी- मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी कोपर्डीकरांना दिलासा देण्यासाठी विविध अाश्वासने दिली होती. देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डीतील त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली, तरी यातील अनेक आश्वासने अजून अधांतरीच आहेत. निर्भयाच्या कुटुंबीयांची परवड संपलेली नाही. 


दोन वर्षांपूर्वी, १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आजही त्या भयानक रात्रीच्या आठवणीने कोपर्डीकरांच्या मनात धस्स होते. या घटनेनंतर कोपर्डीकडे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक मंत्र्यंाची रिघ लागली होती. निर्भयाच्या कुटुंबीयांना आणि ग्रामस्थांना विविध अाश्वासने देण्यात आली. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून कोपर्डी ते राक्षसवाडी रस्त्याचे काम केले जाईल, असे सांगण्यात आले होते. कोपर्डीसाठी आरोग्य केंद्राची घोषणा, कुलधरण येथे पोलिस चौकीची उभारणी फक्त कागदोपत्रीच आहे. कोपर्डी आणि परिसरातील मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यालयाची उभारण्याची घोषणाही फसवीच ठरली आहे. पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल हे आश्वासनही हवेतच विरले. दिवंगत भय्यूजी महाराजांनी कोपर्डी गावात विद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. 


पोलिस चौकीचा प्रस्ताव धुळखात 
कोपर्डी घटनेनंतर कुळधरण आणि परिसरातील गावाच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस चौकीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी ही मागणी मान्य केली होती. मात्र, आजतागायत चौकी कागदोपत्री राहिली आहे. ग्रामपंचायतीने त्याच वेळी पोलिस चौकीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ती बंद आहे. 
- समीर पाटील, पोलिस पाटील, कुळधरण. 


नराधमांना फाशी झाल्यानंतरच मुलीला न्याय 
अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायदेवतेने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्या दिवशी त्या नराधमांना फाशी होईल, त्या दिवशी आमच्या मुलीला अर्थाने न्याय मिळेल.
-  निर्भयाचे आई-वडील. 


निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे 
शाळेत आणि खेळात निपुण असलेल्या निर्भयाच्या आठवणींनी तिच्या मैत्रिणी गहिवरल्या होत्या. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन झाल्याशिवाय तिला न्याय मिळणार नसल्याची भावना त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली. 


विद्यार्थिनी झाल्या भयमुक्त 
निर्भयाच्या शाळेत एकूण ६५० मुली आहेत. १३ जुलैच्या घटनेनंतर विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी समुपदेशन केल्याने त्या आज भयमुक्त वातावरणात शिक्षण घेत आहेत. शाळेने विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठी ४ बस खरेदी केल्या आहेत. शालेय वेळेनुसार एसटी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
- सूर्यभान सुद्रिक, मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय, कुळधरण. 

बातम्या आणखी आहेत...