आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडलेल्या बिबट्याची 11 तास मृत्‍यूशी झुंज, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमुळे जीवदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - रात्रीच्या अंधारात सावज शोधताना बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले. सात परस खोल असलेल्या विहिरीतील पाइपला धरून तब्बल ११ तास त्याने मृत्यूशी झुंज दिली. नंतर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडून या पिल्लाला बाहेर काढले. तालुक्यातील पुणेवाडी येथे ही घटना घडली.

 

दत्त मंदिराजवळ असलेल्या साहेबराव वेणू चेडे यांच्या शेतातील खोल विहिरीत मध्यरात्रीच्या १२ च्या सुमारास सहा महिने वयाचे बिबट्याचे पिल्लू पडले. सकाळी ८.३० वाजता चेडे वीजपंप चालू करण्यासाठी विहिरीजवळ आले. पंप चालू होत नसल्याने त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना पाइपला धरून बिबट्या बसल्याचे दिसले. विहिरीत इतरत्र काही धरायला नसल्याने बिबट्याने फुटव्हॉल्व आणि पाइपला गच्च पकडले होते. चेडे यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना ही माहिती दिली. राहुल चेडे यांनी फोन करून वन अधिकारी ए .ए. कोकाटे व वनरक्षक ए. ए. जाधव यांना ही माहिती दिली. तहसीलदार भारती सागरे व पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनाही कळवण्यात आले. वन अधिकारी व कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी आले.

 

सकाळी १० वाजता पिंजऱ्यात कोंबडी ठेवून क्रेनच्या साहाय्याने तो विहिरीत सोडण्यात आला. तासाभराच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुखरुप वर काढण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर त्याला वैद्यकीय उपचारांसाठी पारनेरला नेण्यात आले. तेथे उपचार करून बिबट्याला जंगलात सोडून देण्यात येणार आहे.


उपवनसंरक्षक एस. आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी ए. ए. कोकाटे, वनपाल एस. एस. साळवे, वनरक्षक के. हे. जाधव, एस. एस. चव्हाण, एन. जे. आगलावे. आर. एम. घोरपडे व ग्रामस्थांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यामुळे पिल्लाचे प्राण वाचले.


वन्यप्राण्यांचा वावर
या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर अाहे. महिन्यापूर्वी तरसाने कोंबड्या व कुत्रे खाल्ले होते. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच मोठी गर्दी झाली. आणखी काही बिबटे येथे असण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...