आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनप्रकरणी मातापूर येथील दिगंबर शिराेळे यास जन्मठेप, मृताच्या कुटुंबास 1 लाख रुपये नुकसान भरपाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - कांद्याचे रोप न दिल्याच्या रागातून फावड्याच्या लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत राजेंद्र कचरू शिरोळे यांच्या मृत्यूप्रकरणी गुरुवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. यू. बघेले यांनी आरोपी दिगंबर बाबुराव शिरोळे यास जन्मठेप व एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली.

 

राजेंद्र कचरू शिरोळे (३५, रा. मातापूर) हा शेतात कांदा रोपाची लागण करत होता. यावेळी आरोपी दिगंबर शिरोळे याने राजेंद्रकडे कांदा रोपाची मागणी केली असता त्याने त्यास एक पोते रोप दिले. परंतु, अजून एक पोते रोप देण्याची मागणी दिगंबर याने राजेंद्रकडे केली. त्यास मनाई केल्याने दिगंबर याने फावड्याच्या लाकडी दांडक्याने त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. मजूर संगीता चक्रनारायण हिने याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. मारहाणीत राजेंद्रच्या अंगावर १६ जखमा झाल्या होत्या. याप्रकरणी अशोक शिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर परदेशी यांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश बघेले यांच्या न्यायालयात सादर केले.

 

याप्रकरणाची सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात संगीता चक्रनारायण, फिर्यादी अशोक शिरोळे, प्रकाश लक्ष्मण शिरोळे या प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. योगेश बंड यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. दंडातील ९० हजार रुपये हे मृत राजेंद्र शिरोळे यांच्या पत्नी व मुलास एकत्रित देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. पी. बी. गटणे यांनी काम पाहिले. याकामी त्यांना ॲड. बी. एल. तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...