आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांचे चित्र व पोलिस लोगो असलेल्या ओमनीतून दारू वाहतूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून अवैध धंदे केले जात आहेत. लोगो, स्टीकर, चित्रे किंवा नावाचा गैरवापर करत अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही असे स्टीकर पहायला मिळतात. पोलिसांनी अशाच एका अवैध देशी दारू वाहणाऱ्या मारुती ओमिनी व्हॅनवर कारवाई केली. 


विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेल्या व्हॅनवर धडधडीत महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आहे, तसेच छत्रपतींचे चित्र व शिवमुद्रा प्रतिष्ठान असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. या एमएच १४ एक्स ३२२२ व्हॅनमधून बेकायदेशीरपणे देशी दारुची वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सोमवारी रात्री ११.३० वाजता पकडलेल्या व्हॅनमध्ये ३ लाख २४ हजार ६९० रुपयांची अवैध देशी दारू मिळाली. या संदर्भात दत्तू श्रावणा रेंगडे (धामणवन, ता. अकोले, हल्ली माळीझाप) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या व्हॅनमधून संगमनेर येथून कोतूळ येथे संजीवनी बॉबी देशी दारूच्या बाटल्या नेण्यात येत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरातील खटपटनाका येथे सापळा रचून मुद्देमालासह व्हॅन पकडली. देशी दारूच्या बाटल्या भरलेले दहा बॅाक्स (किंमत २४ हजार ६९० रुपये) व गाडी असा एकूण ३ लाख २४ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल सागर निपसे, पोलिस नाईक कोरडे, कॉन्स्टेबल पवार, गणेश शिंदे, गुडवाल, चालक शेख यांनी ही कारवाई केली. दत्तू श्रावणा रेंगडे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 


प्रेस गैरवापर रोखा 
महाराष्ट्र पोलिस, प्रेस, पत्रकार, छत्रपती, छावा अशी नावे वाहनांवर लिहून ते अवैध कामासाठी वापरण्याचा प्रकार सध्या सर्रास सुरू आहे. अकोले तालुका पत्रकार संघाने यापूर्वीच पोलिसांना प्रेस नावाच्या गैरवापराबद्दल माहिती देत कारवाईची मागणी केली होती. या गुन्ह्यात तर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावून अवैध देशी दारू वाहतूक केली जात होती. आता तरी पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस, पत्रकार, प्रेस, क्राईम रिपोर्टर अशा नावाने असलेल्या गाड्यांची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...