आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीचा अंत: अपघातग्रस्तांना मदतीऐवजी पंधरा लाख किमतीच्या आंब्यांची लूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- अपघातातील जखमींना तातडीने मदत करण्याऐवजी काही वेळातच सुमारे पंधरा लाख किमतीच्या आंब्यांची लूट करत आपल्यातील माणुसकीचा अंत झाल्याचे लोकांनी दाखवून दिले. मनातील सामाजिक जाणिवादेखील संपल्याचे या घटनेतून दिसून आले. या संतापजनक प्रकारात टोल प्राधिकरणाचे कर्मचारीदेखील सहभागी झाले हे विशेष. दरम्यान, पाच वाहनांच्या या विचित्र   अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले. 


बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुण्याहून नाशिकच्या दिशेने आंबे घेऊन जाणारा टेम्पो चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या टेम्पोतील आंबे रस्त्यावर विखुरले. घटनास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर टोलनाका आहे. नुकतेच चौपदरीकरण झालेल्या या मार्गावर टोल प्राधिकरणाचे कर्मचारी मदतीसाठी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर लगेचच पोलिसांना माहिती देत हे वाहन रस्त्यातून बाजूला घ्यायला हवे होते. मात्र, सकाळपर्यंत अपघातस्थळी कोणीच पोहोचले नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक अशा पाच वाहनांचा विचित्र अपघात तेथे झाला. त्यात एकाचा जीव गेला, तर अन्य दोघे जखमी झाले. 


रस्त्यात उलटलेल्या या टेम्पोवर घाटमाथ्यावरून भरधाव आलेला दुसरा टेम्पो धडकला. या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना वाचवण्याच्या प्रयत्नांत एक कंटेनर दुभाजकावर जाऊन अडकून पडला. हे होत नाही तोच एक मोटारसायकलस्वार थेट या वाहनांच्या खाली गेला. त्या पाठोपाठ आणखी एक टेम्पो भरधाव येऊन या वाहनांना धडकला आणि रस्त्यात अडवा झाला. त्यामुळे रस्त्याची एक लेन वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाली होती. या विचित्र अपघातांत एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. 


अपघात व रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टोल प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेत मदतकार्य सुरू केले. रस्त्यावरील दुभाजक तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तत्पूर्वी टोल प्राधिकरणाचे कर्मचारी आणि प्रवासी, नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनातील रस्त्यावर पडलेले आंबे पळवण्यास प्राधान्य दिले. गोण्यांमधून हे आंबे नेले जात होते. आंबे नेणारे पोलिसांनादेखील जुमानत नव्हते. अपघातग्रस्तांना मदतीऐवजी त्यांची लूट करण्यास प्राधान्य देणाऱ्या नागरिकांमधील माणुसकीचा अंत झाल्याचे दिसून आले. 


आंब्यांची लूट आणि गुरुवार 
गेल्या वर्षीदेखील याच मार्गावर रत्नागिरीहून तीन लाखांचे आंबे घेऊन जाणाऱ्या एका पिकअपला अपघात झाला होता. त्यावेळीदेखील अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी लोकांनी आंब्यांची लूट केली होती. विशेष म्हणजे हा अपघातदेखील गुरुवारी झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसले. या घाटात वाहनचालकांकडून वसुली करणारे महामार्ग पोलिसदेखील या अपघाताकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत मिळू शकली नाही. 

बातम्या आणखी आहेत...