आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोकड्या साधन सामग्रीवर काम करतात महावितरणचे वायरमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत- पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांसह सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. महावितरणचे वायरमन मात्र या पावसाळ्यात धास्तावतात. तोकड्या साधनसामग्रीमुळे वीजप्रवाह खंडित झालेल्या ठिकाणी काम करताना त्यांना कधी कधी जीवावर उदार व्हावे लागते. या महत्त्वाच्या बाबीकडे महावितरण व ठेकेदाराचे दुर्लक्ष झाले आहे. 


कर्जत तालुक्यात महावितरणचे एकूण ५ सेक्शन असून यामध्ये मिरजगाव, माहिजळगाव, राशीन व कर्जत भाग १ आणि २ चा समावेश होतो. या ५ सेक्शनमध्ये प्रत्येकी १० वायरमन कार्यरत असून कर्जत तालुक्यात महावितरणकडे एकूण ५० वायरमन कार्यरत आहे. यामध्ये ६ महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामधील मोजकेच वायरमन हे शासकीय असून उर्वरित कंत्राटी पद्धतीवर अल्प मानधनावर काम करत आहेत. वीजजोडणी, लाइन देखभाल करणे, ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स करणे, लाइन ब्रेक डाऊन काढणे, वीजचोरी पकडणे आदी कामे वायरमन विनातक्रार आणि उपलब्ध असणाऱ्या तोकड्या साधन सामग्रीवर २४ तास करत असतात. पावसाळ्यात हीच कामे दुपटीने वाढतात. 


पावसाळ्यात कोणत्याही वेळी वादळी वाऱ्याने वीजवाहक तारा तुटतात. काही वेळा खांब वाकतात. फ्यूज उडतात. लाइन ब्रेक होण्यासह अनेक भागात एकाच वेळी वीज प्रवाह खंडित होतो. या समस्या वायरमनकडे आल्या की, वेळेचे बंधन न पाळता रात्री-अपरात्री वायरमन दुरुस्तीची कामे करतात. 


काम करत असताना सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याने जीवावर बेतल्याची उदाहरणे आहेत. वायरमनकडे आवश्यक असलेले हँडग्लोज, गमबूट, हेल्मेट नसते. त्यामुळे अनेक शॉक बसण्याचे प्रकार होऊन जीवावरही बेतते. अशा अपघातीप्रसंगी शासनाच्या वतीने तत्काळ वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्याचा वायरमनचा अनुभव आहे. अशा महत्त्वाच्या वेळी इतर कोणतीच शासकीय यंत्रणा वेळेवर मदतीला येत नसल्याची खंत काही वायरमनने दैनिक दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केली. 


गमबूट, हँडग्लोज नाहीत 
मागील तीन वर्षांपासून महावितरणकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने मिळालेली नाहीत. लाकडी झुला, गमबूट, हँडग्लोज आणि रेनकोट नसताना कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून साधने मिळत नाहीत. वायरमनला जीव धोक्यात घालून खांबावरून दुरुस्तीचे काम करावे लागते. दोन वर्षांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले होते.

 
१५ दिवसांत सुरक्षा किट 
मागील दोन ते तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट उपलब्ध झालेले नाहीत ही वस्तुस्थिती. सुरक्षा किटची निविदा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच म्हणजे १५ दिवसांच्या आता सुरक्षा किट उपलब्ध होतील. सध्या महावितरणकडे ५० टक्के कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त अाहेत. अनुभवाच्या कमतरतेमुळे किंवा दुर्दैवाने काही अपघात घडल्यास वायरमनसाठी ३ लाखांची मेडिक्लेम सेवा उपलब्ध आहे. 
- शैलेश जैन, कार्यकारी अभियंता, महावितरण, कर्जत. 

 
'१०८' सेवाही मिळाली नाही... 
मागील वर्षी महाशिवरात्रीला नागेश्वर मंदिरालगत दिव्यांच्या दुरुस्तीचे काम करताना वीजप्रवाह सुरू झाल्याने एक कंत्राटी वायरमन खांबावरून खाली पडला. पायाचे हाड पूर्णपणे तुटून बाहेर लोंबकळले होते. अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम मोठी असल्याने नगरला नेण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेला फोन केला असता खासगी रुग्णालयाचे कारण सांगत सेवा नाकारली गेली.