आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर दूध ओतून निषेध; जिल्ह्यातील संकलन पूर्ण ठप्प, दूध उत्पादकांचा प्रतिसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलनामुळे दूध संकलन होऊ शकले नाही. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. 


राहुरीत ७० लाखांचे नुकसान 
राहुरी तालुक्यात दुधाचे संकलन बंद राहिल्याने तब्बल ७० लाखांचे नुकसान झाले. प्रतिबंधक उपाय म्हणून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. आंदोलनाला पाठिंबा म्हणून लहान-मोठे सहकारी व खासगी दूध संकलन केंद्र, शीतकरण केंद्र बंद ठेवण्यात आल्याने राहुरी तालुक्यात ३ लाख लिटर दुधाचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील दुधाचे मोफत वाटप केले. दुधाला भाववाढ देण्यासाठी शासनाला सुबुध्दी मिळो, अशी मागणी करत गावोगावच्या मंदिरातील मारुती, तसेच देवीच्या मूर्तीला दुधाने आंघोळ घालण्यात आली. टाकळीमिया येथे रस्त्यावर दूध ओतून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील विशेष पोलिस कृती दलाची तुकडी, राहुरीतील ३५ पोलिस व ५ पोलिस अधिकारी पहाटेपासूनच राहुरी तालुक्यातील संवेदनशील भागात तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हमीपत्र घेऊन सोडून दिले. 


शेवगावमध्ये पाठिंबा 
ठिकठिकाणी दूध ओतून देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. क्रांती चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहराध्यक्ष दत्तात्रेय फुंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या धरसोड भूमिकेचा निषेध करण्यात आला. या वेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, भीमराज भडके, रमेश कुसळकर, मच्छिंद्र आर्ले, ज्ञानेश्वर जवरे, बाळासाहेब फटांगरे उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी संघटनेच्या आठ पदाधिकाऱ्यांना अटक करून नंतर सोडून दिले. 


पाथर्डीत तिघे ताब्यात 
आंदोलनाचा परिणाम पाथर्डी तालुक्यात फारसा जाणवला नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दूध संकलन संस्थांनी संकलन बंद ठेवल्याने दूध घ्या दूध म्हणत दूध उत्पादक शहरात फिरत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांनी श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे शिवपिंडीवर दुग्धभिषेक घालून आंदोलनाचे आवाहन दूध उत्पादकांना केले. अभिषेकाचे फोटो समाज माध्यमात झळकताच पोलिसांनी धावपळ करून या कार्यकर्त्यांना शोधायला सुरुवात केली. संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद मरकड, बुधवंत व गणेश पाखरे यांना त्यांनी ताब्यात घेतले. 


दरम्यान, या आंदोलनामुळे तालुक्यात गायीच्या दुधाचा खवा १२०, तर म्हशीच्या खव्याच्या भाव १४० रुपये किलोपर्यंत खाली आले. खवा स्वस्त झाला, तरी शहरातील मिठाई व्यावसायिकांनी जुन्या दरातच मिठाईची विक्री चालवली आहे


खर्डा येथे दूध ओतून आंदोलन 
तालुक्यातील खर्डा, जवळा, नान्नज, अरणगाव व जामखेड येथे रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनाला जामखेड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी खर्डा येथील बसस्थानकासमोरील शिर्डी-हैदराबाद रस्त्यावर दूध रस्त्यावर ओतून शासनाच्या विरोधात 'कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय रहाणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. जोपर्यंत भाववाढ होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील दुधाचा एक थेंबही मंुबईला जाऊ देणार नाही, असे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, नामदेव गोपाळघरे, शिवाजी भोसले, परमेश्वर होडशिळ, विजू क्षीरसागर, सुरेश साळुंके, शीतल भोसले, तुळशीदास गोपाळघरे उपस्थित होते. शासकीय दूध शीतकेंद्र सुरु करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. 


विद्यापीठाच्या मते दूध उत्पादन खर्च ३२ रुपये 
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी १ लिटर दुधाचा उत्पादन खर्च ३२ रुपये असल्याचा अभिप्राय दिला आहे. खर्चाच्या तुलनेत राज्य शासनाला ४८ रुपये प्रतिलिटर दुधाचा भाव द्यावा लागणार आहे. मात्र, महाराष्ट्रात अवघा १७ रुपये भाव झाल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...