आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देणग्या उकळणाऱ्या शाळा बंद करणार, मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शाळा आणि महाविद्यालये देणग्या उकळत असतील, तर त्यांच्याविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार करा. देणग्या उकळताना ज्या शाळा, महाविद्यालये आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रसंगी अशा शाळा बंद केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दिली. दरम्यान, मागील चार वर्षांत केंद्रातील एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

केंद्रीय मंत्री जावडेकर पुण्याहून शिर्डीला जात असताना खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबले होते. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार गांधी व गटनेते सुवेंद्र गांधी यांनी जावडेकर यांचे स्वागत केले. भाजपचे शहर सरचिटणीस किशोर बोरा, शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, गौतम दीक्षित, श्रीकांत साठे, नाना भोरे, विश्वनाथ पोंदे, सागर गोरे, धनंजय जामगावकर, शिवाजी दहिहंडे, छाया रजपूत, वसंत राठोड, राजेंद्र घोरपडे, यशवंत गारडे, प्रशांत मुथा आदी या वेळी उपस्थित होते.

 

जावडेकर म्हणाले, शाळा, महाविद्यालयांनी देणग्या घेण्यावर बंदी आहे, तरीदेखील शाळा, महाविद्यालये पालकांकडून प्रवेशासाठी देणग्या घेत असतील, तर याबाबत तक्रारी कराव्यात. ज्या संस्था देणग्या घेतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यापूर्वी अशा प्रकारची कारवाई झाली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्रातील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. २०१४ मध्ये देशात जेव्हा भाजपची सत्ता आली, त्यावेळी केवळ सहा राज्ये भाजपकडे होती. आता वीस राज्ये झाली आहेत. काँग्रेसकडे त्यावेळी १७ राज्य होती, आता तीनवर आली आहे. यावरून देशातील जनतेचा कल भाजपकडे आहे हे निश्चित होते. राज्यात व केंद्रात चांगला कारभार करून काँग्रेस - राष्ट्रवादीचा काळा कारभार उपटून टाकला. त्यामुळे देशातील प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकत आहे. म्हणून विरोधकांची भाजपविरुद्ध कोल्हेकुई चालू आहे. पारदर्शी, स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभार मोदी सरकार करत आहे.


राजीव गांधी सांगत होते की, मी सर्वसामान्य जनतेला शंभर रुपये पाठवतो. मात्र, त्यातील केवळ १० रुपयेच मिळतात. मात्र, मोदी सरकारने मधले सर्व दलाल हद्दपार करून अनुदानाचे शंभर पैकी शंभर रुपये सर्वसामान्य जनतेच्या खात्यात पोहोचतात. त्यामुळे भाजप सरकारवर जनता समाधानी आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती अशा सर्व निवडणुकाही भाजप जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्रामध्ये अामूलाग्र बदल केंद्र सरकारने घडवून आणले आहेत. शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रच आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील हे तरुण धडाडीचे व स्वच्छ चारित्र्याचे असलेले उमेदवार आहेत. त्यांचा विजय निश्चित होईल, असेही जावडेकर त्यांनी सांगितले.

 

प्रस्ताव आल्यास उद्याने उभारणार
तीन वर्षांपूर्वी पर्यावरण राज्यमंत्री असताना नगरमध्ये प्रकाश जावडेकर आले होते. त्यावेळी त्यांनी नगर शहर 'ग्रीन सिटी' करण्याची घोषणा करून शहरातील वन विभागाच्या मोकळ्या जागेवर उद्याने उभारणार असल्याचे सांगितले होते. याबाबत ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी दैनिक दिव्य मराठीने मंत्री जावडेकर यांची नगर शहर ग्रीन सिटीची घोषणा कागदावरच असे वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत त्यांना विचारले असता माझ्याकडे हे पद असताना देशभरात शंभर ठिकाणी अशी उद्याने उभारली. पुण्यात ७० ठिकाणी उद्याने उभारली अाहेत. नगरमधून असा प्रस्ताव आल्यास निश्चित प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

 

दलाल हद्दपार झाले
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर दलाल हद्दपार झाले आहेत. २० कोटी लाभार्थींच्या खात्यात केंद्र सरकारने ३ लाख ६५ हजार कोटी रुपये थेट जमा केले आहेत. देशभरात साडेपाच कोटी लोकांना शौचालये दिली. शहर व ग्रामीण भागात १ कोटी घरे दिली. ४ कोटी घरात प्रथमच गॅसजोड दिला, असे मंत्री जावडेकर यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...