आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'च्या वृत्ताने संपवली आमदार जगतापांची 'विश्रांती', पुन्हा हर्सूल तुरुंगात रवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केडगावच्या दोन शिवसैनिकांच्या खुनात सहभागी असल्याचा संशय असलेले आरोपी तेथील आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. १६ दिवस घाटी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली त्यांची बडदास्त ठेवली जात होती. त्यांचे पोट प्रचंड का दुखते, याचे निदान होत नसल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला कोणत्या आजारासाठी, किती दिवस उपचार द्यायचे याबाबत घाटी प्रशासनाकडून नेमकी माहितीही दिली जात नव्हती. 'दिव्य मराठी'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांची पाच जून रोजी पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.


केडगाव शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खून पकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह ३५ जणांवर गुन्हा दाखल होऊन अनेकांना अटक झाली. काहींना औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे हलवण्यात आले. जगताप यांनी हर्सूल कारागृहात येताच पोटदुखीची तक्रार केली. त्यामुळे त्यांना १८ मे रोजी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

 

उपचार, सुटी, पुन्हा पोटदुखी
घाटीतील डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जगताप दाखल झाले तेव्हा त्यांचा रक्तदाब वाढला होता. घाम आणि पोटात दुखणे आदींचा त्यांना त्रास होत होता. सुरुवातीला त्यांच्यावर औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी उपचार केले. मग पोटदुखीचा त्रास वाढल्याने याच विभागातील डॉ. अनिल जोशी यांनी उपचार केले. १३ दिवसांनंतर जगतापांना बरे वाटल्यानंतर ३१ मे रोजी सुटी देण्यात आली. कारागृहापर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा त्यांनी पोटदुखीची तक्रार केली. त्यामुळे त्यांना परत घाटीत आणण्यात आले. तेथे त्यांच्या अनेक तपासण्या झाल्या. मात्र, पोटदुखीचे निदान झाले नाही.

 

मेडिकल युनिट दिमतीला
घाटीतील वॉर्ड क्रमांक ८ मधील पेइंग गेस्ट रुम क्रमांक १ मध्ये जगताप उपचार घेत होते. तेथे संपूर्ण मेडिकल युनिट त्यांच्यावर उपचार करत होतेे. 'दिव्य मराठी'ने पाहणी केली तेव्हा जगताप यांचे सुरक्षारक्षक समोरच्या खोलीत होते. चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला घाटीत उपचार घेताना पोलिस हातकडी लावून ठेवतात. मात्र, खुनाचा आरोप असलेल्या आमदारांच्या आजूबाजूला पोलिस, तर सोडाच साधा वॉचमनही नव्हता.

 

जगताप यांना ३१ मे रोजी सुटी दिल्यावर कारागृहापर्यंत पोहोचत नाही तोच त्यांनी पुन्हा पोटदुखीची तक्रार कली. त्यांच्या अनेक तपासण्या केल्या मात्र, नेमके कारण कळत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. याबद्दलचे वृत्त 'दिव्य मराठी'ने प्रसिद्ध करताच जगताप यांना कोणताही गंभीर आजार नाही, असा रिपोर्ट मंगळवारी सकाळी आला आणि त्यांची पुन्हा हर्सूलला रवानगी करण्यात आली. तेथे पोटदुखीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना काही औषधीही लिहून दिल्यावर डॉ. भट्टाचार्य यांनी सांगितले की, त्यांच्या आजाराबाबत आम्हाला जी शंका होती. तसा काही रिपोर्ट आला नाही. त्यांची प्रकृती सुधारल्याचे दिसल्याने त्यांना सुटी दिली आहे.

 

दिव्य मराठीच्या हाती रिपोर्ट
जगताप यांनी केएफटी (किडनी फंक्शन टेस्ट) केली होती. यात त्यांच्या किडनीभोवती गाठ असल्याचे निदान या रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे. मात्र, कोणत्या किडनीजवळ गाठ आहे, याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे आजाराचे निदान होणार, तरी कसे असा प्रश्न डॉक्टर उपस्थित करत १६ दिवस वाट पहात होते. जगताप यांची बायोप्सी करून त्यांची सर्जरी करेणे आवश्यक होते. मात्र, तसे काहीच झाले नाही.
 

या डॉक्टरांनी दिला अहवाल
सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्याकडे जगताप यांना पोटाचा प्रचंड त्रास होत असल्याने पाठवण्यात आले होते. डॉ. सरोजिनी यांनी जगताप यांच्यावर प्राथमिक उपचार करून आजाराबाबत शहानिशा केली. तेव्हा गंभीर काहीच आढळले नाही. काही गोळ्या घेतल्यानंतर ते ठीक होतील, असा अभिप्राय दिला. त्यानंतर डॉ. एस. एस. बीडकर यांच्याकडे त्यांना किडनीच्या बाजूला गाठ असल्याचा रिपोर्ट देऊन उपचारासाठी पाठवण्यात आले. डॉ. बीडकर यांनी जगताप यांना तपासून शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचे सांगत औषध देऊन सुटी द्यावी, असे सांगितले. पुन्हा लूज मोशन आणि उलटीचे कारण पुढे करून डॉ. उद्धव खरे यांनी जगताप यांच्यावर चार दिवस उपचार केले.

 

गंभीर आजार नाही
आमदार जगताप यांना उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांना कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार नाही.
- डॉ. सरोजिनी जाधव, विभागप्रमुख, सर्जरी विभाग.

 

औषधी दिली
त्यांच्या पोटात दुखत होते. त्यांना तपासून औषधी दिली. शस्त्रक्रिया करण्यासारखी गंभीर परिस्थिती नव्हती.
- डॉ. एस. एस. बीडकर.

 

उच्चस्तरीय चौकशी करावी
आमदार जगताप यांना व्हीआयपी सेवा देणाऱ्या घाटीच्या डॉक्टरांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.
- संभाजी कदम, माजी शहरप्रमुख, शिवसेना, अहमदनगर.

बातम्या आणखी आहेत...