आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड: आमदार जगताप यांनी घेतला 90 दिवसांनी मोकळा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगावात दोन शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी तब्बल ९० दिवस गजाअाड असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी सायंकाळी कारागृहाबाहेर पाय ठेवत मोकळा श्वास घेतला. या प्रकरणात त्यांच्यासह बाळासाहेब एकनाथ कोतकर यांना शनिवारी दुपारी न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह सशर्त जामीन मंजूर केला. हत्याकांड घडले त्याच दिवशी मध्यरात्री पोलिसांनी जगताप यांना अटक केली होती. तेव्हापासून ते गजाआड होते.

 

केडगावातील शाहूनगर परिसरात ७ एप्रिलला सायंकाळी संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप, भानुदास कोतकर, संदीप कोतकर, आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप यांच्यासह ३० जणांची आरोपी म्हणून नावे फिर्यादीत नावे आली. या सर्वांनी कट रचून मारेकरी संदीप गुंजाळ व इतर आरोपींद्वारे हत्याकांड घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी लगेचच आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले.

 

सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, नंतर विशेष तपास पथकाने या तपास करून १० आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी करून आवश्यक ते पुरावे गोळा केले. मात्र, पोलिस तपासावर वारंवार राजकीय आरोप झाल्याने तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने ३८ दिवस, तर सीअायडीने ५२ दिवस या गुन्ह्याचा तपास केला. नव्वदाव्या दिवशी मुदतीत दोषारोपपत्र दाखल झाले. अन दुसऱ्याच दिवशी जामीन अर्ज न्यायालयात आले.

 

साक्षीदारांवर दबाव नको
संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांना जामीन देण्यास सरकार पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. मात्र, अॅड. महेश तवले यांनी युक्तिवाद करताना जगताप व कोतकर यांच्याविरुद्ध अद्याप कोणतेही पुरावे गवसले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोघांना सशर्त जामीन मंजूर केला. जामिनावर मुक्त झाल्यानंतर दोन्ही आरोपींना साक्षीदारांवर दबाव आणू नये, तपास यंत्रणेला सहकार्य करावे, चौकशीला हजर रहावे, या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.

 

समर्थक औरंगाबादला
जामीन मंजूर झाल्यानंतर आमदार जगताप समर्थक औरंगाबादकडे रवाना झाले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाचा लखोटा नगर येथील सबजेल प्रशासनाकडे देण्यात आला. तेथील प्रक्रिया पूर्ण करून वकिलांची टीम आैरंगाबादकडे रवाना झाली. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर आमदार जगताप कारागृहातून बाहेर आले.

 

भद्रा मारुतीचे दर्शन
आमदार जगताप हे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हर्सुल कारागृहातून बाहेर आले. कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते येथे भ्रदा मारुतीच्या दर्शनासाठी गेलेे. ते रात्री नगरकडे रवाना झाले. नगरमध्ये आल्यानंतर ते स्व. कैलास गिरवले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील, अशी माहिती आमदार जगताप यांच्या समर्थकांनी दिली.

 

समर्थक सोशल मीडियावर
केडगाव दुहेरी हत्याकांडातील दोषारोपपत्रात नाव नसल्याने आमदार संग्राम जगताप समर्थक शुक्रवारपासूनच सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत होते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, अखेर सत्याचा विजय अशा अनेक पोस्ट जगताप यांच्या फोटोसह सोशल मीडियावर फिरत होत्या. जामीन मंजूर झाल्यानंतर या पोस्टची संख्याही वाढली होती.

बातम्या आणखी आहेत...