आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. संग्राम जगताप, कोतकरांना जामीन; केडगाव दुहेरी हत्या प्रकरणात दिलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी ९० दिवसांपासून अटकेतील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांना शनिवारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. शुक्रवारी सीआयडीकडून दाखल दोषारोपपत्रात दोघांविरुद्ध दोष नव्हते. मात्र फौजदारी दंड संहिता कलमानुसार त्यांच्याबद्दल तपास सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यावर सुनावणी होऊन कोर्टाने ते मंजूरही केले.


केडगावात शाहूनगर परिसरात ७ एप्रिलला संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या झाली होती. पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना ताब्यात घेतले होते. मात्र, समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घालत जगताप यांना नेले. पोलिसांनी काही तासांतच त्यांना पुन्हा ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक कार्यालयात राडा घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

 

हत्याकांड घडल्यापासून जगताप तुरुंगात होते. त्यांची पोलिस कोठडीही वारंवार वाढली होती. नंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. मात्र सबजेलमधून त्यांची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली. तेथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला गुन्हा शाखा, नंतर विशेष तपास पथकाने केला. नंतर सीआयडीकडे तपास वर्ग झाला. मात्र ९० दिवसांच्या पोलिस तपासात आमदार जगताप व कोतकर यांच्याविरुद्ध  ठोस पुरावे आढळले नाही. सीआयडीने सादर केलेल्या दोषारोपपत्रात त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे स्पष्ट करावे लागले. त्यामुळे दोघांच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने दोघांचीही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.

बातम्या आणखी आहेत...