आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा रुग्णालयात ऑनड्युटी कर्मचाऱ्यांना मोबाइल वापरण्यास बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी साईबाबा व साईनाथ रुग्णालयास भेट देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. बहुतांशी नातेवाईकांनी मोबाइलसंदर्भात तक्रारी केल्याने ऑनड्युटी कर्मचाऱ्यांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्याचे निर्देश डॉ. हावरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. गेल्या महिन्यात डॉ. हावरे यांनी जवळच्या नातेवाईकास भेट दिली होती. त्यावेळी अन्य रुग्णांची विचारपूस किंवा रुग्णालयाची पाहणी न करताच ते निघून गेल्याने नाराजी व्यक्त झाली होती. यावेळी डॉ. हावरे यांनी रुग्ण व नातेवाईकांची विचारपूस करुन समस्या समजावून घेतल्या. 

 

डॉक्टर व परिचारिकांच्या कामाबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केले. मात्र सोशल वर्कर, सुरक्षा रक्षक व काही कर्मचाऱ्यांच्या उध्दटपणाबद्दल तक्रारी केल्या. यात लवकरच सुधारणा करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले. दोन्ही रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी डॉ. हावरे यांनी चर्चा केली. रुग्णालयातील कमतरता असलेल्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची लवकरच भरती करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


नातेवाईकांचे साहित्य व मूल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकर सुविधा, तसेच ग्रंथालय सुरू करण्याचे, रुग्णालयाच्या आवारात झेरॉक्स मशीन उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ऑनड्युटी असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोबाइल वापरू नये, अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली. रुग्णालयाच्या वाढीव मजल्याच्या कामाचे भूमिपूजन डॉ. हावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, प्रशासकीय अधिकारी घोरपडे, पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, वैद्यकीय संचालक डॉ. भारंबीकर, डॉ. नरोडे उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...