आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथीत शिकणाऱ्या मुलीचा बाथरूममध्ये कोंडून विनयभंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता- येथील एका नामांकित मराठी शाळेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कोंडून चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला गेल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत संबंधित तरूणावर गुन्हा दाखल केला गेला नव्हता. 


ही घटना बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. शाळा सुटल्यानंतर मुलगी शाळेच्या बाथरूममध्ये गेली असता एक तरूण आत आला. त्याने दरवाजा बंद करत मुलीला चाकू दाखवत तिच्याशी अश्लिल कृत्य केले. नंतर लगतच्या भिंतीवरून उडी मारून त्याने पळ काढला. मुलीने घरी गेल्यावर हा प्रकार आईला सांगितला. गुरूवारी मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती शिक्षकांना सांगितली. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी तरुण त्यात दिसला. मात्र, संबंधित शिक्षकाने त्याचा शोध घेणे व पोलिसांना कळवण्याचे सोडून तिच्या पालकांची समजूत काढून त्यांना घरी परत पाठवले. 


या घटनेची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्यांनी मुलीसह पालकांना घेऊन गुरूवारी रात्री राहाता पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली. शुक्रवारी पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. अश्लिल कृत्य करणारा तरुण कोणत्या मार्गे पळाला, हे पाहण्यात आले. काही नागरिकांनी त्या तरुणास पळताना पाहिले आहे. पीडित मुलीच्या पालकांची फिर्याद दाखल करून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे यांनी दिली. 


या प्रकारामुळे पालकांत संतापाची लाट निर्माण झाली. या शाळेत यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. मात्र, प्रशासनाने डोळेझाक केली. अशा कृत्यांना प्रतिबंध करण्याऐवजी प्रशासन घटना दाबण्याचा का प्रयत्न करते, असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे. आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...