आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध व शेतमालाच्या रास्त दरासाठी कळस येथे रास्ता रोको आंदोलन; छावा वॉरियर्सचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- दुधाला किमान २७ रुपये दर मिळावा व शेतमालाला दीडपट भावाची हमी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी कळस येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. छावा वॉरियर्स संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या या आंदोलनात स्थानिक व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


'लुटता कशाला फुकटच   न्या' म्हणत राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनानंतरही दुधाचे भाव न वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदतो आहे. रास्ता रोकोच्या निमित्ताने या संतापाची दखल सरकारने घ्यावी, अशी भावना यावेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध दरप्रश्नी १ जूनला राज्यभर तहसील कार्यालयांना घेराव घालून आंदोलन करण्याची हाक दिली आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने दूध उत्पादक सहभागी होतील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 


संघर्ष समितीच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने दूध दर वाढवावेत, यासाठी दूध पावडर बनवण्यासाठी संघांना एक महिन्यासाठी लिटरमागे ३ रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या उपायामुळे पावडर उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होऊन अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागेल, असे सरकारला वाटते आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदान जाहीर होऊन पंधरा दिवस उलटून गेले, तरीही दूधदरात काडीचाही फरक पडलेला नाही. उरलेल्या पंधरा दिवसांतही या उपायामुळे काही फरक पडेल अशी शक्यता नाही. अशा परिस्थितीत संघर्षाशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग शिल्लक नसल्याचे शेतकऱ्यांचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. 


धोरणात्मक हस्तक्षेपाच्या दीर्घकालीन उपायांबरोबरच दूध उत्पादकांना भावांतर योजनेंतर्गत सरळ त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची मागणी नवले यांनी केली. शेतीमालाचे भाव सातत्याने पडत आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकरी भाव नसल्याने अक्षरशः रस्त्यावर माल फेकून देत आहेत. भर उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दरही न्यूनतम पातळीवर पोहोचले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नाशवंत शेतीमालाच्या कोसळणाऱ्या दरांबाबत हस्तक्षेप करण्यासाठी सरकार पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. नाशवंत मालाला संरक्षण देता यावे, यासाठी केंद्र सरकार योजना बनवणार असून त्यासाठी ५०० कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र सरकारच्या वतीने या संदर्भात कोणतीही हलचाल होत नसल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष आणखी वाढत असल्याचे डॉ. नवले म्हणाले. 


ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, दिलीप शेणकर, शांताराम वाळुंज, विलास आरोटे, गणेश ताजणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजेंद्र भांगरे, दशरथ सावंत, विकास वाकचौरे आदींची यावेळी भाषणे झाली. राजेंद्र गवांदे यांनी सूत्रसंचालन केले. छावा वॉरियर्स संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची तरुण पिढी शेतकरी बापाच्यामागे ठामपणे उभे रहात आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याबद्दल त्यांचे सर्वच वक्त्यांनी मनापासून कौतुक केले. छावा वॉरियर्स संघटनेच्या वतीने राहुल वाकचौरे, प्रभात चौधरी, संग्राम विराट, नागेश मोहिते, स्वप्नील बालोडे, सचिन वाकचौरे, संतोष चव्हाण, संतोष वाकचौरे व सागर मोहिते यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. शेतकरी आंदोलन यशस्वी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...