आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळेबाज मोदीचे नगरमध्येही घबाड? जिल्‍ह्यात तब्‍बल 153 एकर जमीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करुन पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे नगर कनेक्शन समोर आले आहे. नगर जिल्ह्यात त्याची तब्बल १५३ एकर जमीन असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. ही जमीन नगर-पुणे रस्त्यावर असल्याची चर्चा आहे. पंजाब नॅशनल बँकेने शनिवारी या जमिनीवर जप्ती आणल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली.

 

निर्यातीची बनावट हमीपत्रे तयार करुन मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल साडेअकरा हजार कोटींचा गंडा घातला. या घोटाळ्याचा तपास ईडी करत असून अद्याप मोदीचा ठावठिकाणा लागलेला नाही. ईडीने तिसऱ्यांदा मोदीला समन्स बजावले आहे. २६ फेब्रुवारीला ईडीसमोर हजर न झाल्यात प्रत्यार्पणाची कारवाई केली जाणार आहे.

 

सरकारी यंत्रणांनी मोदीच्या मालमत्तेवर जप्तीच्या कारवाईचे सत्र सुरू केले आहे. देशातील विविध शहरांमध्ये असलेले त्याचे बंगले, फ्लॅट, फार्म हाऊस, व्यावसायिक कार्यालये आदींवर छापेसत्र सुरू आहे. नगर जिल्ह्यात मोदी याची १५३ एकर जमीन असून त्यावरही जप्तीची कारवाई केल्याचे वृत्त वाहिन्यांवर झळकल्याने खळबळ उडाली.

 

अशा प्रकारच्या कारवाईबाबत महसूल विभागाकडे चौकशी केली असता, या कारवाईची काहीही माहिती नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाब नॅशनल बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही याबाबत अनभिज्ञ असल्याचे समजते.

 

बातम्या आणखी आहेत...