आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक सोसायटीच्या सभेत इमारत बांधकामावरून गोंधळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- पाथर्डी व शेवगावमधील इमारतीच्या बांधकामाच्या मुद्यावरून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभेत रविवारी गोंधळ झाला. गोंधळाची परंपरा कायम राहिली. 


शिक्षक सोसायटीची सभा म्हणजे मारामारी, धक्काबुक्की, गोंधळ हे समीकरण काही वर्षांपासून दृढ झाले आहे. यंदा त्याचीच पुनरावृत्ती झाली. मात्र, सत्ताधारी पुरोगामी सहकार मंडळ आणि विरोधातील परिवर्तन मंडळाच्या नेत्यांचा विधान परिषद निवडणुकीत झालेला दारूण पराभव नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या मनाला इतका लागला की, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासह कोणी फारसे पुढे आले नाही. पुरोगामी सहकार मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे आणि परिवर्तन मंडळाचे अप्पासाहेब शिंदे यांचा नाशिक शिक्षक मतदारसंघात दारूण पराभव झाला. त्याचे सावट सभेवर पडले होते. 


सोसायटीचे अध्यक्ष किशोर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नाथकृपा सांस्कृतिक भवनात सभाली. सचिव सोन्याबापू सोनवणे इतिवृत्त वाचत असताना त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. सभासद नंदकुमार सोनवणे यांनी २०१६-१७ च्या अहवालातील ७१ लाखांच्या मृत सभासद निधीमधील तफावतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जास्तीची जमा आणि जास्तीचा खर्च याचा हवाला देत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. तसे आढळल्यास आमचे सर्व संचालक राजीनामा देतील, असे कचरे म्हणाले. तक्रारीत तथ्य नसल्याचा अहवाल उपनिबंधकांनी दिला आहे, असा खुलासाही त्यांनी केला. 


सभासद मारूती लांडगे यांनी ऐच्छिक ठेवी आणि कायम ठेवीवरील व्याज, कर्जावरील व्याज, सहकारी बँकेकडील कॅश क्रेडिटवरील व्याज यांच्यातील तफावतीमुळे नफा जास्त होत आहे, असे सांगितले. सोसायटी स्वभांडवली करण्याची सूचना त्यांनी केली. सुनील दानवे यांनी पाथर्डी-शेवगावमधील इमारत बांधकामासाठी अपेक्षित निधी, खर्च यात फरक असून बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून सभेत गोंधळ सुरू झाला. काही सभासदांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. भाऊसाहेब जिवडे यांनी संस्थचे अॅप बनवा, असा मुद्दा मांडला. संतोष ठाणगे यांनी सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव उत्तर देत नाहीत. कचरेच का उत्तर देतात, असा प्रश्न उपस्थित केला. अरविंद देशमुख यांना सोसायटीचे बँकेत रूपांतर करा असे सांगितले. या सभेस सभासदांची उपस्थिती नेहमीपेक्षा कमी होती. 


कानपिचक्या अन् वचपा... 
भाऊसाहेब कचरे आणि अप्पासाहेब शिंदे यांच्यातील विळ्या-भोपळ्याच्या नात्याचा प्रत्यय नेहमीच येतो. मृत सभासद कर्ज निवारण निधीमधील जास्तीची जमा आणि जास्तीचा खर्च यावरून शिंदेंनी ऑडिटरला ५२ लाख फी देतो, मग तो चुकतोच कसा असा प्रश्न केला. त्यावर ऑडिटर चुकलेला नाही, चार वर्षे संचालक राहूनही संचालकांना ऑडिट रिपोर्टची भाषा समजत नाही ही शोकांतिका आहे, असे म्हणत कचरेंनी शिंदे यांना कानपिचक्या दिल्या. मायक्रोसॉफ्ट लायसन्ससाठी संस्थेने ७ लाख ८८ हजार खर्च केला. २ लाख ४० हजारांत इतर लोक हे सॉफ्टवेअर द्यायला तयार आहेत. मी संचालक म्हणून विरोध करत असतानाही पैसे देण्याची घाई का केली, असा प्रश्न करत शिंदे यांनी कचरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत वचपा काढला. 

बातम्या आणखी आहेत...