आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांची लाच घेताना नायब तहसीलदारास अटक; 'लाचलुचपत'ची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रेशनच्या धान्याने भरलेला टेम्पो सोडवण्यासाठी दरमहा ५० हजार याप्रमाणे आठ लाखांची मागणी करणाऱ्या लाचखोर पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यास (नायब तहसीलदार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखांची लाच घेताना गुरूवारी रंगेहाथ अटक केली. नितीन रमेश गर्जे असे त्याचे नाव अाहे. जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच गर्जे याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. 


तक्रारदार व त्यांची भावजई हे दोघे रेशनचे दुकान चालवतात. त्यांच्या दुकानासाठी मालवाहतूक करणारा टेम्पो गर्जे याने काही दिवसांपूर्वी पकडला. कारवाई न करण्यासाठी गर्जे याने दरमहा ५० हजारांचा हप्ता मागितला. मागील सर्व हप्ते मिळून आठ लाखांची मागणी त्याने केली. त्यापैकी दोन लाख घेण्यासाठी त्याने तक्रारदारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रस्त्यावर बोलावले होते. गर्जे याने दोन लाखांची लाच स्वीकारताच लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलिस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल तनवीर शेख, दत्तात्रय बेरड, सतीश जोशी, प्रशांत जाधव, विजय गंगुल यांनी ही कामगिरी केली. कोणी लाचेची मागणी करत असेल, तर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक चौधरी यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...