आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीय विषमता भेदण्यासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज; डॉ. अनिकेत आमटे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देशात जातीय संघटना विकासाला घातक ठरत आहेत. जातीय विषमता भेदण्यासाठी युवकांना एकत्र येण्याची गरज आहे. शाळा देखील जात, धर्म व पंथामध्ये विभागली जावून जातीयतेचे विष विद्यार्थ्यांमध्ये पेरले जात आहे. जातीयता थोपवण्याची युवकांची जबाबदारी असून, शाळांपासूनच काम सुरू करण्याचे आवाहन डॉ. प्रकाश आमटे यांचे पुत्र तथा हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी केले. 


अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने बडी साजन मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय युवा शक्ती संवाद व सन्मान सोहळ्याच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. समाजातील निराधार, वंचित घटकांच्या व रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ काम करत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर लंके, संस्थेचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ, संजय शिंगवी, शारदा होशिंग, अंजली देवकर उपस्थित होते. 


आमटे म्हणाले, एखाद्या संस्थेच्या सामाजिक कार्याने प्रेरणा मिळून जीवनाला दिशा मिळू शकते. हेमलकसा येथे शिक्षणामुळे परिवर्तन घडले. सामाजिक काम करणाऱ्यांना अडचण येत असते. मात्र, सातत्याने निस्वार्थपणे काम केल्यास समाजमान्यता मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले काम पोहोचत आहे.


प्रितमकुमार बेदरकर म्हणाले, ही कार्यशाळा म्हणजे मी कडून, आम्हीकडे घेऊन जाणारा जीवनसमृद्ध प्रवास आहे. तरुणांची समाजाबद्दलची संवेदनशीलता, जाणीव आणि सहभाग वाढवण्यासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे बेदरकर यांनी संस्थेच्या वतीने स्पष्ट केले. बेवारस मनोरुग्णांना आधार देऊन, त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेचे कार्य देखील त्यांनी स्पष्ट केले. आजवर संस्थेच्या वतीने ४२५ रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिकेत आमटे यांनी केडगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास भेट देऊन तेथे मनोरुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती जाणून घेत संस्थेच्या कार्याचे कौतूक केले. सूत्रसंचालन अमोल राठोड यांनी केले. दिलीप गुंजाळ यांनी आभार मानले.


यांचा नवशक्ती युवा पुरस्काराने गाैरव 
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सोलापूर येथील स्नेहग्राम संस्थेचे महेश निंबाळकर, नाशिक येथील मानवधर्म फाउंडेशनच्या सुलक्षणा आहेर, नगरच्या केअरिंग फ्रेंड्सचे अंबादास चव्हाण यांना आमटे यांच्या हस्ते नवशक्ती युवा समाजसेवक पुरस्काराने गौरवण्यात आले. कोल्हापूर येथील माणुसकी फाउंडेशनचे अमित प्रभा यांच्या वतीने सतीश शांताराम यांनी पुरस्कार स्वीकारला. 

बातम्या आणखी आहेत...