आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात, आरटीओने केली 54 वाहनांवर कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरात विद्याथ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका शिक्षण मंडळ, वाहतूक पोलिस, तसेच संबंधीत शाळांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र (आरटीओ) या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. विद्यार्थी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ५४ वाहनांवर आरटीओ दीपक पाटील यांनी कारवाई केली. या वाहनधारकांकडून सुमारे पावणे दोन लाखांचा दंड वसूल करून काही वाहने जप्त केली. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.

 

शहरात दीडशेपेक्षा अधिक खासगी शाळा आहेत. त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बस आहेत. मात्र, या बस विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी योग्य आहेत की नाही, याकडे शाळा प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या शालेय परिवाहन समितीच्या निर्देशांकडे देखील या शाळा दुर्लक्ष करत आहेत. प्रत्येक शाळे परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक योग्य पध्दतीने होते की नाही, हे तपासण्याची जबाबदारी या समितीची आहे. परंतु अनेक शाळांमध्ये ही समितीच अस्तित्वात नाही. परिणामी सर्व नियम पायदळी तुडवत विद्याथ्यांची वाहतूक सुरू आहे. आरटीओ पाटील यांनी मात्र विद्याथ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर वाहनांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३८ स्कूल बस व १६ मारुती व्हॅन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात प्रथमच अशी कारवाई झाल्याने शाळांसह विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर वाहनधारकांचे धाबे दणाणले अाहे. या वाहनांविरोधात सुरू करण्यात आलेली कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची ने- आण करणारी वाहने देखील सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठीच नियम पायदळी तुडवत विद्यार्थ्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे शहरातील विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीर वाहतूकीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

 

समिती कागदावरच
शासनाने सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी २०१२ मध्ये विशेष नियम तयार केले आहेत. या नियमांनुसार स्कूल बससेवा सुरू आहे किंवा नाही, याची पाहणी करण्याचे काम संबंधित शाळेच्या परिवहन समितीचे आहे. परंतु बहुतेक शाळांनी अद्याप परिवहन समितीच स्थापन केलेली नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असते.

 

बसचालकासोबत दोन क्लीनर
स्कूलबसचा रंग असलेल्या अनेक व्हॅन विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. मात्र, या वाहनधारकांकडे विद्यार्थी वाहतुकीचा कोणताही परवाना नाही. अशा १६ वाहनांवर आरटीओने कारवाई करून ती वाहने जप्त केली.

 

दुप्पट विद्यार्थी
शहरातील अनेक शाळा स्कूल बसची सुविधा देत असल्या, तरी त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. यामुळे अनेक पालक कमी दर असलेल्या रिक्षांच्या शोधात असतात. रिक्षातून तीन ते चार विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची परवानगी असताना त्याच्या दुप्पट विद्यार्थ्यांना कोंबले जाते. लहान कार, व्हॅनची क्षमता सात ते आठ विद्यार्थ्यांची असताना जवळपास १५ विद्यार्थ्यांना बसवले जाते.

 

पार्किंगच नाही
बहुतांश शाळांनी पालकांची वाहने इमारतीत पार्क करण्यासाठी व्यवस्थाच नाही. शैक्षणिक संकुलासाठीच्या नियमानुसार प्रत्येक दीडशे चाैमी बांधकामासाठी एक चारचाकी व चार दुचाकींसाठी पार्किंगची गरज अाहे. प्रत्यक्षात, शाळांमध्ये तितक्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. परिणामी पालकांनाही शाळेच्या बाहेर वाहने उभी करावी लागतात.

 

... तर देवही माफ करणार नाही
शहरात स्कूल बस, व्हॅन, तसेच रिक्षांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होते. मात्र, वाहतूक करणारी ही वाहने नियम पाळतात की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. भविष्यात एखादी दुर्घटना झाली, तर देवही आपल्याला माफ करणार नाही. त्यासाठीच आम्ही ही कारवाई सुरू केली आहे. कारवाई सुरू होताच अनेक शाळांनी परिवहन समिती स्थापन केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे.
- दीपक पाटील, आरटीओ.

 

बातम्या आणखी आहेत...