आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीची माहिती देत बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- जिल्हाभरातील ६२६ शिक्षकांना अपेक्षित २० पैकी एकही शाळा मिळू न शकल्याने ते विस्थापित झाले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १२४, तर त्या खालोखाल नगर तालुक्यात ९६ शिक्षक विस्थापित झाले आहेत. अनेकांनी खोटी माहिती भरत अपेक्षित शाळा मिळवली. परिणामी आमच्यावर अन्याय झाला, असा आरोप करत विस्थापित शिक्षकांनी प्रस्थापित शिक्षकांची पोलखोल करत तक्रारींचा पाऊसच पाडला. जिल्ह्यात तब्बल ४८० तक्रारी दाखल झाल्या. त्यात शिक्षकांसाठी मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या नगर तालुक्यात सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे चुकीची माहिती भरत बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. 


शिक्षकांच्या बहुचर्चित बदल्यांना शासनाने अंतिम स्वरूप देत मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया सुरू केली. नगर जिल्ह्यात २८ मे रोजी शिक्षकांना बदलीचे आदेश मिळाले. जिल्ह्यातील ७ हजार ३४६ बदलीपात्र शिक्षकांपैकी ५ हजार ४३९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. शिक्षकांनी बदली अर्ज भरून देतेवेळी अपेक्षित २० शाळांची नावे दिली होती. पण जिल्ह्यात ६२६ शिक्षकांना अपेक्षित २० शाळा न मिळाल्याने ते विस्थापित झाले. त्यात ५७९ उपाध्यापक, ३४ पदवीधर आणि १३ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. विस्थापितांमध्ये संगमनेर तालुक्यात तब्बल १२४, नगर ९७, अकोले ४६, जामखेड १३, कर्जत १०, कोपरगाव ११, पारनेर ७८, पाथर्डी ५९, राहुरी २१, शेवगाव १८, तर श्रीगोंद्यामधील १७ शिक्षक विस्थापित झाले. विस्थापितांसाठी आता सोयीस्कर गावे राहिलेली नाहीत. अपेक्षित २० पैकी गावे मिळाल्याने ४ हजार ८१३ शिक्षक प्रस्थापित झाले. पण प्रस्थापित होताना अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरत हवी ती गावे मिळवल्याने आम्हाला अपेक्षित गावे मिळू शकली नाहीत, असा आरोप करत प्रस्थापितांची पोलखोल करणारे काही पुरावे देत तब्बल ६२६ तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे खोटी माहिती भरून अपेक्षित गावे मिळवलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. 


सर्वाधिक तक्रारी या पती-पत्नी एकत्रिकरणाच्या अंतराबाबत आहेत. बदलीपूर्वी नियमानुसार ३० किलोमीटर अंतर मर्यादेच्या आत असतानाही ३० किमीपेक्षा जास्त अंतराचे दाखले जोडून एकत्रिकरणाचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आहेत. सेवाज्येष्ठ असतानाही सेवाज्येष्ठतेने कमी असणाऱ्या शिक्षकाला गाव मिळाले आणि मला मिळाले नाही, पती किंवा पत्नी शासकीय-निमशासकीय सेवेत असल्याबाबतची चुकीची माहिती देत बदलीसाठी लाभ घेतला. मतिमंद पालकत्वाचा चुकीचा लाभ घेतला. पुनर्विवाहित असतानाही घटस्फोटिताचा लाभ घेतला, एकत्र रहात असतानाही घटस्फोटित असल्याचे दाखवले, अपंगत्वाचे चुकीचे दाखले दिले. अशा एक ना अनेक स्वरूपाच्या तक्रारींचा पाऊसच शिक्षण विभागाकडे पडला आहे. 


कारवाई होणार 
बदलीसाठी अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. अशांच्या २ वेतनवाढी थांबवल्या जाऊन शिस्तभंगाबद्दल त्या शिक्षकाची झालेली बदली रद्द करून त्याची अवघड क्षेत्रात बदली करून तो पुढील पाच वर्षे बदली मागू शकणार नाही. 


जास्तीच्या अंतराचा दाखला 
पती-पत्नी एकत्रिकरणाबाबत अंतरासाठी अनेक शिक्षकांनी एसटी महामंडळाकडून अंतराचे दाखले घेतले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडील माहितीनुसार दोन गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता गुगलवरही दिसतो आहे, पण या दोन गावांना सलगतेने जोडणारी एसटी सेवा नाही. त्यामुळे एसटीसाठी फिरून जावे लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व गुगलपेक्षा जास्त अंतराची एसटी महामंडळाच्या दप्तरी नोंद असल्याने त्याचा फायदा अंतर वाढवण्यासाठी शिक्षकांनी घेत बदली होण्यासाठी जास्तीच्या अंतराचा दाखला जोडला आहे. 


तक्रारी एनआयसीकडे 
शिक्षक बदल्यांबाबत नगर जिल्ह्यात ४८० तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारी शिक्षक बदली प्रक्रिया पाहणारा शासनाचा एनआयसी विभाग आहे. त्यांच्याकडे या सर्व तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत. तेथून जसे निर्देश येतील, त्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल.
- रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक. 

बातम्या आणखी आहेत...