आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यारंभ आदेश मिळाला; आता मुहूर्त कधी लागणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेची आर्थिक अवस्था हलाखीची झाली असल्याने कर्मचाऱ्यांचे पगारदेखील वेळेवर होत नाही. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. निधी नसल्याने पदाधिकारी महापालिकेत फिरकत नाहीत. या पार्श्वभूमीवर भुयारी गटार योजनेच्या कामाला कार्यारंभाचे आदेश प्रशासनाने दिल्यामुळे महापौरांसह सर्व पदाधिकारी खूश झाले आहेत. कार्यारंभ आदेश मिळताच नंदुरबार येथील ड्रीम कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदाराने पदाधिकाऱ्यांची भेट घेत सहकार्य करण्याची विनंती केली. 


गेल्या पाच-सहा वर्षांपासून भुयारी गटार योजनेचे काम कागदावरच रखडले होते. आता १३१ कोटी खर्चाच्या या भुयारी गटार योजनचे काम सुरू होणार आहे. ही योजना शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. संपूर्ण नगर शहरासह उपनगरांचा या योजनेत समावेश आहे. संबंधित ठेकेदाराला येत्या दोन वर्षांत ही योजना पूर्ण करण्यास सांगितले आहे. बुधवारी सकाळी ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. 


भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून वाढीव पाणीपुरवठा योजनेनंतर शहरात तिसरी मोठी योजना होत आहे. शहर वाढीव पाणीपुरवठा योजना म्हणून ओळखली जाणारी फेज २ योजना तब्बल १५० कोटींची आहे. मात्र, या योजनेचे आदेश येऊन दशक उलटले, तरीही या योजनेचे काम चालूच आहे. त्यानंतर शहरात अमृत योजना सुरू झाली. या योजनेची कामे चालू असून त्यानंतर आता भुयारी गटार योजना शहरात सुरू होत आहे. पाच-सहा वर्षांनंतर या योजनेच्या कामाला सुरुवात होत आहे. या योजनेचा निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेच्या कामाचा कार्यारंभाचे आदेश दिला असल्याने महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह स्थायी समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले. आजवर विकासकामांना निधी उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे पदाधिकारीही निराश होते. आता नव्याने काम सुरू होत असल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. 


काम रखडू नये... 
अमृत योजनेचे कामे सुरू होऊन आता तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्याप या योजनेच्या कामाला प्रारंभ झालेला नाही. या कामाचा प्रारंभ शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मानस होता. मात्र, अजूनपर्यंत तरी या कामाला प्रारंभ झालेला नाही. आता भुयारी गटार योजेनच्या कामाला कार्यारंभ आदेश मिळाला. मात्र, प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे. शुभारंभामुळे काम रखडू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. 


कामाचा खर्च झाला दुप्पट... 
प्रशासनाचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, फेज २ किंवा अमृत योजनेकडे पदाधिकाऱ्यांचे आजवर दुर्लक्ष झाले. महापालिकेत कोणाचीही सत्ता आली, तरी हे दुर्लक्ष होतच राहिले. त्यामुळे अजूनही फेज २ योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. या योजनेचे काम रेंगाळत गेल्याने कामाचा खर्चदेखील वाढत गेला आहे. सुरूवातीला फक्त ७६ कोटींची असलेली ही योजना १५० कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे आतापर्यंत वेळेबरोबर पैसेही वाया गेले आहेत.