आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील गैरव्यवहारावर अखेर शिक्कामोर्तब, मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचा निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील प्रभाग १ व २८ मध्ये पथदिव्यांच्या कामात अनियमितता असून महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले आहे. चौकशीचा २२ पानांचा अहवाल उघडल्यानंतर गुरुवारी आयुक्त घनश्याम मंगळे यांनी तसे स्पष्ट केले, पण दोषींची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. सोमवारी अहवालाचे अवलोकन करून सविस्तर माहिती देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

 

शहरातील प्रभाग १ व २८ मधील पथदिव्यांच्या कामांची बजेट रजिस्टरला नोंद नसतानाही परस्पर खोट्या स्वाक्षरी करून ४० लाखांची बिले काढण्यात आली. कामे न करताच ही बिले काढण्यात आली, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी स्थायी समितीच्या सभेत केला होता. दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही या समितीने दिले होते. दुसऱ्या दिवशी महासभा होती. या सभेतही या गैरव्यवहारांचे पडसाद उमटले. कोणतीही ट्युबलर फिटिंगची २० कामे न करताच परस्पर बिले काढल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली होती. या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाल्याने महापौर सुरेखा कदम यांनी ही सभा तहकूब केली होती. तहकूब सभा दोन दिवसांनंतर पुन्हा घेण्यात आली. त्या सभेत आयुक्त मंगळे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. या कामांच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे व नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. पथदिव्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी, बजेट रजिस्टरची तपासणी, उपलब्ध असलेल्या प्रस्तावांसह त्यावर स्वाक्षऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांची साक्ष घेणे, संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे जबाब आदींची माहिती घेण्यात येणार होती. आयुक्तांनी चौकशीसाठी मंगळवारपर्यंत (९ जानेवारी) मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर बुधवारी (१० जानेवारी) चौकशी अहवाल निष्कर्षासह आयुक्त मंगळे यांना सादर करण्यात आला.

 

चौकशी अहवालात नेमके काय सिद्ध होते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले होते. गुरुवारी आयुक्त मंगळे यांनी अहवाल उघडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंगळे म्हणाले, चौकशीत गंभीर अनियमितता असल्याचे समोर आले आहे. तसेच मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बजेटला तरतूद नाही, याचाच अर्थ अनियमितता झाली असा आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांनी मागितलेली माहितीही आम्ही लगेच पाठवली आहे. या प्रकरणी सविस्तर अहवाल वाचून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असेही आयुक्त मंगळे यांनी सांगितले. पण कोणावर ठपका ठेवला, कोण दोषी आहे, यांची नावे आयुक्तांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत.

 

काय आहे निष्कर्ष
अहवालानुसार संबंधित प्रभागातील नगरसेवकांची साक्ष घेतली असता, त्यांनी कामे सूचवले नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही कामे कोणी सूचवली याचा बोध होत नाही. ठेकेदार साक्ष देण्यासाठी उपस्थित राहिला नाही. मूळ संचिका उपलब्ध नाही. असे सिद्ध होते की, या प्रकरणात गंभीर अनियमितता झाली आहे. तसेच मनपाची आर्थिक फसवणूक झाली आहे.

 

पुढे काय होणार?
अभियंता आर. जी. सातपुते, बाळासाहेब सावळे यांना निलंबन करण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर दोषी ठरवलेल्यांची नावे आस्थापना विभागालाही कळवली जाणार आहेत. आस्थापना यासंदर्भात संबंधितांकडून खुलासे मागवू शकते. खुलासे आल्यानंतर आयुक्तांना आस्थापना विभाग सादर करेल. त्यानंतर दोषींवर कोणती कारवाई करायची याचा निर्णय ते घेणार आहेत.


गुन्हे दाखल करण्यासाठी माहिती
महापालिकेने पथदिव्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिस प्रशासनाला यापूर्वीच पत्र दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी पोल उभारणीचा ठराव, निविदा प्रक्रिया, मूळ नस्ती कोणाकडे आहे? आदी माहिती मागवल्याचे समजले. त्यानुसार गुरुवारी दुपारी शहर अभियंत्यांनी पोलिसांना सादर केली आहे. या प्रकरणात आता गुन्हा कधी दाखल होणार याकडे लक्ष लागले आहे.

 

फाईलचे गूढ कायम
पथदिव्यांच्या कामांची फाईल संबंधित विभागात असणे आवश्यक आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून फाईल सादर करण्यात संबंधित विभाग अपयशी ठरला. फाईल ठेकेदाराकडेच असल्याचे अधिकाऱ्यांनी महासभेत कबूल केले होते. फाईल नेमकी कोणाकडे? याचे गूढ अजूनही कायम आहे. गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...