आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐनवेळी घुसवलेले ठराव होणार रद्द; शासन स्तरावर चौकशी करण्याचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्याच्या विषयावर आक्षेप घेत अजेंड्यावर नसलेले विषय कार्यवृत्तात घालण्यात आले आहेत. त्यामुळे इतिवृत्त कायम करण्यास स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी विरोध केला. जे विषय अजेंड्यावर नसताना घुसवण्यात आले, त्यांची शासन स्तरावर चौकशी करण्याचे आदेश सभापती बाबासाहेब वाकळे यांनी दिले. त्यामुळे हे ठराव रद्द होण्याची शक्यता आहे. 


स्थायी समितीच्या सभेत सातव्या क्रमांकाचा विषय मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्यासाठी ठेवण्यात आला होता. बोराटे म्हणाले, जे विषय अजेंड्यावर नाहीत, ते विषय यामध्ये कसे घुसवले, याचा खुलासा करा. त्यावर नगरसचिव एस. बी. तडवी म्हणाले, विषयपत्रिकेत नसतानाही घेतलेल्या विषयाचे ठराव रद्द होणार आहेत. याबाबत शासनाकडे चौकशीसाठी माहिती सादर केली आहे. बोराटे म्हणाले, मागील सभेच्या कार्यवृत्तात रक्तपेढीतील पुनर्नियुक्तीच्या विषयापुढे बचगट, उद्यान देखभाल, मत्सालय, खेळणी देण्यास मान्यता देण्यात आली, तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ६५ लाखांची तरतूद, खोल्या भाडेकरारावर देण्याचा ठराव घेण्यात आला. हे विषय कोणी घुसवले याची चौकशी करून कार्यवृत्त कायम करू नये. विषयांना आमची मंजुरी घ्या, बोगस विषय कशाला समाविष्ट करता? त्यावर तडवी म्हणाले, असे विषय घुसवले, तर ठराव रद्द होतो, याची माहिती शासन स्तरावर सादर केली जाईल. वाकळे यांनी केवळ अजेंड्यावरील विषयांचे कार्यवृत्त करण्यास मंजुरी दिली. 


हा प्रकार समितीत उघड झाल्यामुळे यापूर्वी झालेल्या सभांमध्ये असे ठराव घुसवल्याचे प्रकार झाल्याचा संशय आहे. जर असे ठराव अजेंड्यावर नसतानांही इितवृत्त लिहिताना समाविष्ट होत असतील, तर स्थायी समितीला अर्थ उरणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. 


सूचक व अनुमोदक जबाबदार 
अजेंड्यावर विषय नसताना जर तसे विषय त्यात ऐनवेळी समाविष्ट करून ठराव करण्यात आले, तर हे ठराव विखंडित म्हणजे रद्द होतात. अशा ठरावांना सूचक व अनुमोदक जबाबदार असतात. शासनस्तरावरच याची चौकशी केली जाईल, असे सचिव एस. बी. तडवी यांनी स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...