आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या नऊ मिनिटांत उरकले अंदाजपत्रकीय भाषण, जिल्हा परिषदेच्या ३८ कोटी ९८ लाखांच्या अंदाजपत्रकाला मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत २०१८-१९ या वर्षासाठी अंदाजपत्रक मांडण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेचे अर्थ समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी सभेसमोर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकीय भाषण झाले. दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. २ वाजून ४ मिनिटांनी त्यांचे भाषण संपले. कोट्यवधींची तरतूद असलेले अंदाजपत्रक सादर करणाऱ्या सभापतींनी अवघ्या नऊ मिनिटांतच अंदाजपत्रकीय भाषण उरकून घेतले.दरम्यान, सभेत जिल्हा परिषदेच्या ३८ कोटी ९८ लाख ३७ हजार ३२७ रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली. 

 

जिल्हा परिषदेने सोमवारी २०१७-१८ च्या मूळ अंदाजपत्रक तसेच २०१८-१९ चे अंतिम सुधारिक अंदाजपत्रक, तसेच २०१८-१९ चे मुळ अंदाजपत्रक अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष राजश्री घुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, कृषी पशुसंवर्धन समितीचे अजय फटांगरे, समाजकल्याण समितीचे उमेश परहर, काँग्रेसच्या पक्ष प्रतोद अाशा दिघे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पक्षप्रतोद सुनील गडाख, शिवसेनेचे शरद नवले,सदस्य राजेश परजणे,हर्षदा काकडे, शिवाजीराजे गाडे, माधवराव लामखडे, संदेश कार्ले, तेजश्री लंघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .अशोक कोल्हे मुख्य व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचा २०१८-१९ अर्थ संकल्प पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर या अर्थसंकल्पात महत्त्वाची भूमिका असलेल्या अर्थ समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी अंदाजपत्रकीय भाषण सुरु केले. सभागृहात दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे सर्व भाषण हे लेखी स्वरुपाचे होते. केवळ त्यांनी ते वाचून दाखवले. १ वाजून ५५ मिनिटांनी सुरु झालेले भाषण २ वाजून ४ मिनिटांनी संपले. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मुळ व सुधारित तरतूदीची माहिती दिली. विशेष म्हणजे सभागृहात पंखे सुरु असताना नऊ मिनिटांच्या भाषणात घामाघूम झालेल्या सभापती वाकचौरे यांनी भाषण संपताच खुर्चीवर बसून घेतले. त्यानंतर सदस्य सुनील गडाख यांनी सभागृहात अर्थ विभागाने दक्षिण, उत्तर विभागासाठी बांधकामासाठी चार-चार कोटीचा निधी व जलव्यवस्थापनासाठी ३ कोटी अर्थसंकल्पात वाढवून मिळावेत,अशी मागणी केली. मागील अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात भरीव निधी मिळावा.जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेत अनेक सदस्य नवीन आहेत.त्यांना वाढलेल्या बजेटबाबत माहिती दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर ४९ कोटींचा निधी मागे गेला.त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर विखे यांनी यंदाचा अर्थसंकल्पात ८ टक्के वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाने वीज नसलेल्या ठिकाणी संगणक व हॉयमॅक्स दिवे दिले, याच्या चौकशीची मागणी केली. अर्थसंकल्पीय सभेपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. अनुकंपा तत्त्वावरील भरतीबाबत जेथे गैरप्रकार झाले त्याची चौकशी करावी, अशी मागणी सुनील गडाख यांनी केली. त्यावर विखे यांनी विभागीय आयुक्तांना यासाठी पत्र दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर जालिंदर वाकचौरे यांनी सर्वसाधारण सभा ही तीन महिन्यांनी घेणे बंधनकारक असताना ही सभा पाच महिन्यानंतर घेतल्याची बाब निर्देशनास आणून दिली.त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मोकळे भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्यावर देखील चर्चा झाली. 


वाकचौरे, कार्ले, गडाख यांच्यात खंडाजंगी 
अर्थसंकल्पात वाढीव निधीवरुन वाकचौरे, संदेश कार्ले, सुनील गडाख यांच्यात खंडाजंगी झाली. वाकचौरे यांनी आम्हाला सभागृहात बोलून दिले जात नाही, असा आरोप केला.सभागृहात हा प्रकार सुरु असताना सभापती वाकचौरे यांनी मुख्य लेखा अधिकारी श्रीकांत अनारसे, मुख्य कार्यकारी अधिकारी माने, विखे यांनी चर्चा केली. मात्र ती चर्चा काय होती, हे मात्र समजले नाही.

 

अर्थसंकल्प ठेकेदारांसाठी 
जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती अर्थसंकल्पाबाबत गंभीर नाहीत. अर्थसंकल्पात तरतूदी करताना सदस्य व अनेक सभापतींना विश्वासात घेतले गेले नाही.हा अर्थसंकल्प प्रभावी झाला नाही.लोकांच्या पदरात काहीच पडणार नाही.यापेक्षाही चांगला अर्थसंकल्प सादर करता आला असता.ठेकेदारांसाठीच हा अर्थसंकल्प आहे, असा आरोप भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सभेनंतर केला. 

 

आता धरण घेऊन जायचे का ? 
शेवगाव शहर व पाथर्डी तालुक्यातील काही गावांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा मुद्दा हर्षदा काकडे यांनी उपस्थित केला. वसुली चांगली होऊनही दूषित पाणी पुरवठा केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर संबधित विभागाच्या अधिका ऱ्यांनी धरणातच पाणी दुषित असल्याचे सांगितले. त्यावर काकडे यांनी धरण घेऊन जायचे का ? असा प्रश्न उपस्थित केला. 

बातम्या आणखी आहेत...