आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या 'दिलासा' सेलने सावरले 180 महिलांचे संसार, 652 पैकी 358 प्रकरणे निकाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचे कौतुक होईल. पण त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोजके अपवाद वगळता स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा उदासीन असल्याचे दिसते. जिल्हा पोलिस प्रशासनाचे "दिलासा' सेल मात्र अवघ्या सात महिन्यांत महिलांच्या सबलतेसाठी, न्याय हक्कांसाठी व त्यांना आधार देण्यासाठी यशस्वी ठरले आहे.

 

या सेलच्या माध्यमातून १८० महिलांचे विस्कटलेले संसार सावरले आहेत. नवरा-बायको, सासू-सुनाची भांडणे, तसेच इतर कारणांमुळे हे संसार थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. 'दिलासा'च्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण यांनी समुदेशन करत या संसारांना सावरण्याचे काम केले. नवरा- बायकोच्या एकूण ६५२ दाखल तक्रार अर्जांपैकी ३५८ प्रकरणे 'दिलासा'ने निकाली काढली.

 

विस्ताराने मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून दररोज अनेक गुन्हे दाखल होतात. त्यात नवरा-बायकोचे भांडण, महिलांना मारहाण, छळ अशा गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अनेक संसार थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतात. मात्र, विस्कटलेल्या अशा संसारावर घटस्फोटाची वेळच येऊ नये, नवरा- बायकोच्या भांडणात त्यांच्या मुलांची ससेहोलपट होऊ नये, याच उद्देशाने पोलिस प्रशासनातर्फे 'दिलासा' सेल चालवला जातो. आतापर्यंत या "दिलासा''चे स्वरूप व्यापक नव्हते. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसांतच या "दिलासा''चे स्वरूप बदलून टाकले. नागपूर येथे कार्यरत असताना शर्मा यांनी तेथे 'भरोसा' नावाने सेल सुरू केला. नगर आल्यानंतर त्यांनी नागपूरच्या धर्तीवरच "दिलासा''चे पुनरूज्जीवन केले. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या व स्वत:च्या मेहनतीवर पीएसआय झालेल्या महिला अधिकारी कल्पना चव्हाण यांच्याकडे त्यांनी 'दिलासा'ची जबाबदारी सोपवली.

 

चव्हाण यांनी गेल्या सात महिन्यांमध्ये दाखल ६५२ प्रकरणांपैकी ३५८ प्रकरणे निकाली काढली. त्यापैकी १८० महिलांचे मोडलेले संसार पुन्हा उभे राहfले. 'दिलासा'मध्ये करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे या नवरा-बायकोंचे आपसातील वाद मिटले. त्यामुळे त्यांचे विस्कटलेले संसार पुन्हा उभे राहिले आहेत.


काही प्रकरणे प्रलंबित असून त्यांचे समुदेशनाचे काम सुरू आहे, तर काहींवर मानसोपचार सुरू आहेत, एवढेच नाही, तर काहींना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचे कामही 'दिलासा' करत आहे.

 

पीडितांना शेवटपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न
पोलिस, विधी अधिकारी, संरक्षण अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक असे सर्व सहाय्य पीडितांना दिले जाते. तक्रारी स्वीकारण्यासाठी दिलासाचे दरवाजे चोवीस तास उघडे असतात. १०९१ व १०० या क्रमांकावर तक्रारी स्वीकारल्या जातात. पीडितांच्या मानसिकतेचा विचार करून तिचे समुपदेशन करणे, आवश्यकता असल्यास निवासाची व्यवस्था देखील 'दिलासा'कडून करण्यात येते. जोपर्यंत न्याय मिळत नाही, अथवा पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पीिडतांची तक्रार बंद करण्यात येत नाही.

 

एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा
आतापर्यंत अनेक प्रकरणे निकाली काढता आली. चारित्र्यावर संशय, दारुचे व्यसन, माहेरच्या लोकांचा संसारातील हस्तक्षेप, मोबाइलचा अतिवापर, तसेच विभक्त राहण्याची इच्छा ही संसार विस्कटण्याची प्रमुख कारणे आहेत. संसार टिकवण्यासाठी एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा असतो. त्याला तडा जाऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
- कल्पना चव्हाण, प्रमुख़़, दिलासा सेल.
 

बातम्या आणखी आहेत...