आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदनवन लॉन्सवर प्रशासनाचा हातोडा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई स्थगित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्याची मोहम सुरू आहे, याच कारवाईचा एक भाग म्हणून टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्सच्या अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने या कारवाईला 'जैसे थे'चे आदेश दिल्याने कारवाई स्थगित करण्यात आली. परंतु, इतर पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. 


सीना नदी शहराच्या हद्दीतून १४ किलोमीटर वाहते. शहरात या नदीचे पात्र अतिक्रमणांमुळे कमालीचे अरुंद झाले आहे. मोठा पाऊस झाल्यास नदीतील अतिक्रमणांच्या अडथळ्यामुळे नदीपात्र बदलून लोकवस्तीत पाणी शिरण्याचा धोका आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून या पात्रातील अतिक्रमणे काढण्याची गरज होती. या विषयाकडे 'दिव्य मराठी'ने लक्ष वेधले होते. नदीपात्राची हद्द दीड वर्षापूर्वी निश्चित करून हद्दीवर पिवळ्या रंगाचे खांब रोवण्यात आले होते. शहरातील ज्या भागात हद्द निश्चितीचे काम बाकी होते, ते काम नुकतेच पूर्ण करून घेण्यात आले आहे. महापालिकेचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आल्यापासून त्यांनी मनपाला शिस्त लावण्याबरोबरच अतिक्रमणांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सीना नदी ही जलसंपदा विभागाच्या अधिकार कक्षातील आहे. नदीपात्रात वीटभट्ट्या, पक्की बांधकामे, पत्र्यांचे शेड, शेती आदींची अतिक्रमणे आहेत. त्यामुळे नदीची रुंदी बहुतेक ठिकाणी अवघी दहा ते पंधरा मीटर उरली आहे. नदीचा कोंडलेला श्वास मोकळा करून नदी प्रवाहाला नैसर्गिक उताराने वाट मोकळी करून देण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानुसार अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. 


कारवाईसाठी सध्या २ पोकलेन २५ ते ३० डंपरच्या माध्यमांतून कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाईसाठी जलसंपदा विभागाचे दोन पोकलेन कार्यरत आहेत. या कारवाईसाठी आवश्यक इंधन खर्च मनपाने उचललेला आहे. नदीपात्रात बेकायदेशीर भराव करून अतिक्रमणांनी नदीचे पात्रच गिळंकृत केले आहे. पहिल्या टप्प्यात नदीपात्रातील भराव काढण्यात येत आहे. नदीच्या उजव्या बाजूला कारवाई सुरू असली, तरी उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात पक्की अतिक्रमणे आहेत. त्यावर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न 'दिव्य मराठी'ने वारंवार उपस्थित केला होता. त्यानुसार गुरुवारी अतिक्रमणांची मोहीम नदीपात्रात आढळून आलेल्या नंदनवन लॉनवर करण्यास सुरुवात करण्यात आली. 


नंदनवन लॉनचे संचालक सुरेश जाधव यांनी तातडीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली, त्यावर न्यायालयाने 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदेश प्रत्यक्ष हातात येईपर्यंत लॉनमधील स्टेज पाडण्यात आले होते. त्यानंतर कारवाई तूर्त स्थगित करण्यात आली. परंतु, इतर ठिकाणची कारवाई सुरूच आहे. शुक्रवारपासून इतर पक्क्या अतिक्रमणांवरही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. नंदनवन लॉनव्यतिरिक्त इतर काही पक्की बांधकामे करणारे व्यावसायिकही प्रशासनाने निश्चित केलेल्या हद्दीत येत आहेत. 


माझी जागा सोडून कारवाई करा 
तीन दिवसांपूर्वी माझ्या मालकीच्या जागेत खांब रोबवण्यात आले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई सुरू केली. पोल रोवल्यानंतर आम्ही न्यायालयात गेलो होतो. न्यायालयाने 'जैसे थे'चे आदेश दिले आहेत. ही माझ्या मालकीची जागा अाहे. कारवाईचे आम्ही स्वागत करतो, पण माझी जागा सोडून कारवाई करावी.
-  सुरेश जाधव, संचालक, नंदनवन लॉन. 


मनपाने नोटीस बजावलीच नाही 
नंदनवनची जागा पन्नास ते साठ वर्षांपासून ताब्यात अाहे. पालिकेने कोणतीही नोटीस न बजावता ताबा घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही न्यायालयात मनाई हुकूम मागितला होता. त्यावर न्यायालयाने जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे. शुक्रवारी (८ जून) पालिकेला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
- अॅड. वैभव भापकर, वकील. 


कारवाई सुरूच राहणार 
नदीपात्रातील भराव काढण्याचे काम सुरूच आहे. गुरुवारपासून पक्क्या बांधकामांच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली. नंदनवन लॉनच्या भागात कारवाई सुरू करण्यात आली होती. पण न्यायालयाचे आदेश आल्यानंतर कारवाई स्थगित केली आहे. पण इतर पक्की अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरूच राहणार आहे.
-  सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख. मनपा. 

बातम्या आणखी आहेत...