आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट: सीना नदीच्या पात्रातील भराव काढण्यास सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील सीना नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्यास अखेर सुरूवात झाली आहे. सोमवारी सकाळी नगर पुणे रस्त्यावरील पूल व लोखंडी पूल येथील परिसरातून सीनापात्रातील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाली. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार   आहे. या मोहिमेमुळे सीना नदीचा गेल्या अनेक वर्षांपासून कोंडलेला श्वास मोकळा होणार आहे. दैनिक दिव्य मराठीने या समस्येकडे सर्वप्रथम लक्ष वेधले होते. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. अखेर सीनापात्रातील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 


शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सीना नदीचे सुशोभिकरण व्हावे, ही नागरिकांची अनेक वर्षांपासूची मागणी होती. मात्र अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न प्रलंबित पडला होता. सीना नदीपात्रातील विटभट्ट्या कच्ची व पक्की बंधकामे, भराव टाकून वाढवलेल्या जागा व त्यावर थाटलेले बेकायदेशीर बांधकामे, यामुळे सीना नदीचे पात्र अरुंद झाले होते. या नदीला पूर आल्यास बेकायदेशीर अतिक्रमणांमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होऊन मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता होती. 


जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी आपत्ती व्यवस्थापाचा एक भाग म्हणून नदीचा श्वास मोकळा करण्याचा निर्णय घेतला. बेकायदेशीर वीटभट्टया, महसूल पाटबंधारे व मनपा प्रशासनाला आजतागायत हटवता आल्या नव्हत्या. आता थेट जिल्हाधिकरा्यांनीच या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे इतर सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अतिक्रमण हटवण्याबाबत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मागील दोन आठवड्यात वारंवार बैठका घेतल्या होत्या. 


बैठकांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सीना नदीतील अतिक्रमण हटवण्याबाबत सूचना केल्या होत्या. दीड वर्षांपूर्व सीना नदी पात्राची हद्द निश्चित करण्यासाठी पाटबंधारे, मोजणी कार्यालय तसेच मनपाने प्रयत्न केले होते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी हद्द निश्चित झाली होती. पण टिळक रस्ता व सावेडीच्या काही भागात मोजणी होऊन हद्द निश्चित करणे बाकी होते. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांनी स्वत:हूनच काढावीत, यासाठी सात दिवसांचा अवधी दिला होता. 


ही मुदत संपल्यानंतर कारवाई करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. दरम्यान रविवारी संबंधित प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते. सकाळपासूनच राहिलेल्या भागाची मोजणी करुन पोल रोवण्यात आले आहेत. सोमवारी सकाळपासूनच कारवाईला सुरूवात करण्यता आली आहे. यासाठी चार पोकलेन व त्यासह २०-२५ डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोकलेनची संख्या ऐनवेळी वाढवण्याची व्यवस्था केलेली आहे. 


तर कायदेशीर कारवाई 
पावसाळा तोंडावर आल्यामुळे ही मोहीम लवकर सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून ही कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पाळून सीना नदीतील अतिक्रमण हटवले जात आहे. यााबाबत नागरिकांचे काही म्हणणे असेल, तर ते ऐकून संबंधित विभागाने त्या नागरिकांचे शंका निरसन करण्याचे सांगण्यात आले आहे. जर कोणी अतिक्रमण मोहिमेत अडथळा आणला, तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येतील.
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी. 


मोहिमेला कडक बंदोबस्त 
अतिक्रमण हटाव कारवाईत कोणी बाधा आणू नये, यासाठी ५० ते ६० विविध शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...