आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर- परिस्थिती कशीही असो…प्रतिकूल वा अनुकूल यश हे तुमच्या मनस्थितीवरच अवलंबून असते. तुमच्यात जिद्द असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही पराभव स्वीकारत नाही हा संदेश दिव्यांग जयंत मंकले याने दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेत मूळचा बीड येथील जयंतने देशात ९२३ वी रँक मिळवली. नोकरीला लागल्याच्या दोन वर्षांतच आलेले दिव्यांगत्व आणि गरिबीवर मात करत जयंतने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.
जयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून २०१३ मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे व भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली.
या कालावधीत जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. त्यामुळे दोन-तीन अपघातही झाले. आई व बहिणींनी ही नोकरी सोडण्याचे जयंतला सांगितले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर जयंतला आयइएसमध्ये (इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस) जायचे होते. मात्र, आयइएसमध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे नैराश्य आले. खासगी क्षेत्रात मला नोकरी मिळणे अशक्य होते. मात्र, शिक्षणासाठी कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडायचे होते. त्यामुळे आवड म्हणून आणि पोटा-पाण्याची गरज म्हणून, तसेच शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यास आई व बहिणींनीही प्रोत्साहन दिले.
२०१५ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत पोहोचलो. मात्र, पुढे जाऊ शकलो नाही. त्यामुळे निराश झालाे. मात्र, गेल्या वेळच्या चुका सुधारण्यासाठी या क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.
स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची फी भरमसाठ असल्याने घरीच अभ्यास केला. दिसण्यास व वाचण्यास अडचण येत असल्याने वाचण्यापेक्षा ऐकण्यावर भर दिला. अशी सर्व कसरत करत यावर्षी यशस्वी झालो. या यशासाठी युनिक अॅकेडमीचे मनाेहर भोळे व मराठी साहित्याचे प्रवीण चव्हाण यांची मदत झाली, असे जयंतने सांगितले.
सामाजिक व आर्थिक न्याय गाठण्याचे ध्येय
परिश्रम, प्रामाणिकपणा, निष्ठा, सत्य आणि न्याय या मूल्यांवर आतापर्यंत मी प्रवास केला आहे. तसेच भारतीय घटनेच्या, संविधानाच्या प्रास्ताविकेत म्हटल्याप्रमाणे सामाजिक व आर्थिक न्याय गाठण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पुढील आयुष्यात सातत्याने प्रयत्न राहतील, असे जयंत याने 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.
आई व बहिणींचे प्रोत्साहन ठरले महत्त्वाचे
वडील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात पंपचालक म्हणून कामाला होते. त्यांचे २००३ मध्येे निधन झाले. आईला ७३०० रुपये पेन्शन मिळते. आई शेवया, चकल्या, लाडू करून, तर दोघा बहिणींनीही शिकवण्या घेत घराला हातभार लावत मला यूपीएससीच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला हे यश मिळाल्याचे जयंतने 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
दिव्यांगांनी आपली स्वप्ने पूर्ण करावी
केंद्र सरकारने २०१६ मध्ये दिव्यांगांसाठीच्या कायद्यात सुधारणा करून सरकारी सेवेत चार टक्के आरक्षण ठेवले आहे. या कायद्याची व्याप्तीही वाढवली आहे. त्यानुसार अॅसिड हल्ला, कुष्ठरोग या आजारांनी पीडित व्यक्तींनाही सरकारी सेवेत आरक्षण आहे. त्याची मदत घेत दिव्यांगांनी आपली स्वप्ने पूर्ण करावी, असे आवाहन जयंत मंकले याने केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.