आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड: आमदार शिवाजी कर्डिलेंना हत्येच्या गुन्ह्यात वर्ग करण्‍याची शक्‍यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, त्यांचे नाव केडगाव दुहेरी हत्याकांडातही फिर्यादीने घेतले आहे. त्यामुळे त्यांना आता केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात वर्ग करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार, भानुदास कोतकर ऊर्फ बीएम, बाळासाहेब कोतकर, तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी (१६ एप्रिल) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. हत्याकांडातील मारेकरी सापडून तीन दिवस उलटले आहेत, तरीही पोलिसांना गुन्ह्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे व गावठी कट्टा पुरवणारा बाबासाहेब केदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, मारेकरी अटकेत असूनही पोलिसांना अद्याप गुन्ह्याचे नेमके कारण समजलेले नाही. याच गुन्ह्यात आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप, शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्याविरोधात भादंवि कलम १२० ब अंतर्गत हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार जगताप यांना हत्या घडली, त्याच दिवशी अटक केली, तर कर्डिले यांना पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी अटक करण्यात आली. कर्डिले सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना केडगाव हत्याकांडाच्या गुन्ह्यात पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, हत्याकांडातील मुख्य आरोपी गुंजाळ, गिऱ्हे व मोकळे यांची चौकशी करूनही आमदार जगताप व कर्डिलेंविरोधात सबळ पुरावे मिळालेले नाहीत. जगताप यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांना पुन्हा पोलिस कोठडी मागण्यासाठी पोलिसांना सबळ पुरावे सादर करावे लागणार आहेत. मात्र, आतापर्यंतचा तपास पाहता आमदार जगताप व कर्डिले यांचा हत्याकांडात सहभाग असल्याबाबत निष्पन्न झालेले नाही. पोलिसांनीही त्यास दुजोरा दिला.

 

आरोपी ठरतोय डोकेदुखी
गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याने हत्याकांडानंतर काही वेळातच पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. मी एकट्यानेच ही हत्या केली असून त्याचा घटनाक्रमही त्याने सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने गिऱ्हे, मोकळे व आणखी एकाचे नाव घेतले. चौघांनी मिळून कशी हत्या केली, याचा घटनाक्रमही सांगितला. त्यानंतर पोलिस त्रास देत असल्याची तक्रारही न्यायालयासमाेर केली. ही तक्रार मागे घेत आपल्याला पोलिसांनी मारले नसून पडल्यामुळे जखम झाल्याचेही त्याने सांगितले. गुंजाळ याची ही अक्कलहुशारी व दररोजचे वेगवेगळे जबाब यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

 

कैलास गिरवले यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी पुण्यात हलवले
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात करण्यात आलेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी सुमारे अडीचशे जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून त्यापैकी ४४ जणांना अटक करण्यात अाली आहे. त्यातील आरोपी कैलास गिरवले यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. परंतु अंमली व स्फोटक पदार्थांच्या साठ्याप्रकरणी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. गिरवले हे एमआयडीसी येथील कोठडीत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.


पुढील स्‍लाइडवर वाचा, जगतापांच्या सुनावणीकडे लक्ष...

 

बातम्या आणखी आहेत...