आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगाव हत्याकांड : ज्यांच्याविरोधात पुरावे, त्यांना सोडणार नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासाला गती मिळाली आहे. आतापर्यंत १२ जणांची चौकशी करण्यात आली आहे. तथापि, आम्ही अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. ज्यांच्या विरोधात पुरावे नाहीत, त्यांना अटक करणार नाही. मात्र, पुरावे मिळताच कोणाचीही गय केली जाणार नाही. कोणत्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपणे गुन्ह्याचा तपास करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, आरोपींना गावठी कट्टे पुरवणारा बाबासाहेब विठ्ठल केदार (३८, अंबिकानगर, केडगाव, मूळ गाव िनमगाव वाघा) याला पोिलसांनी अटक केली आहे. 

 

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी सुमारे नऊशे जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हत्याकांडप्रकरणी ३० जणांच्या विरोधात, पोलिस अधीक्षक कार्यालय फोडल्याप्रकरणी अडीचशे जणांच्या विरोधात, तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या सहाशे शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या तिन्ही प्रकरणांच्या तपासात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 


शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची ७ एप्रिलला सायंकाळी ६ च्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम याच्या फिर्यादीवरून ३० जणांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यापैकी आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर व भानुदास ऊर्फ बीएम कोतकर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी गुंजाळ याने हत्याकांडानंतर काही वेळातच पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, हा गुन्हा गुंजाळने एकट्याने केला नसल्याची पोलिसांना खात्री आहे. पाच-सहाजणांनी मिळून हा गुन्हा केल्याचा पोलिसांचा संशय आहे. गुंजाळ दररोज वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिस निष्कर्षापर्यंत पोहोचले नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. येत्या तीन-चार दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत, त्यांची गय केली जाणार नसल्याचेही शर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. 
यावेळी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि मनीष कलवानिया, एसआयटी पथकाचे प्रमुख रोहिदास पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, कोतवालीचे निरीक्षक रमेश रत्नपारखी आदी उपस्थित होते. 


हत्येनंतर गुंजाळचा पोलिसाला फोन 
कोतकर व ठुबे यांच्या हत्येनंतर काही वेळातच आरोपी गुंजाळ याने कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोनी यांना फोन केला. यावेळी सोनी साप्ताहिक सुटीवर होते. मी दोघांची हत्या केली असून आता मी पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत असल्याचे गुंजाळ याने साेनी यांना सांगितले. सोनी यांनी तत्काळ सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना माहिती दिली. आरोपी गुंजाळ व त्याची पत्नी यांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याची चौकशी सोनी करत होते. त्यामुळे सोनी यांचा फोन नंबर आरोपी गुंजाळ याच्याकडे होता. 


शिवसैनिकांवर गुन्हे ; चौकशी सुरू 
सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, मृतदेहाची विटंबना करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी सुरू असून लवकरच अटकेची कार्यवाही होईल. शासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत. दबावाला बळी न पडता गुन्हे दाखल असलेले शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांवर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले.  

बातम्या आणखी आहेत...