आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - संजय कोतकर यांना मी स्वत:, तर वसंत ठुबे यांना संदीप गिऱ्हे याने मारल्याची कबुली आरोपी संदीप गुंजाळ याने पोलिसांसमोर दिली. गुन्ह्याचा घटनाक्रमही त्याने सांगितला. पण, या हत्याकांडाशी आपला काहीच संबंध नसल्याचे गिऱ्हे हा प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगत आहे. दोघांच्या या विसंगत जबाबांमुळे पोलिस चक्रावून गेले आहेत. त्यातच दररोज वेगवेगळे जबाब देऊन दिशाभूल करणारा आरोपी गुंजाळ याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. त्यामुळे तांत्रिक तपास, तसेच फरार आरोपी विशाल कोतकर व रवी खोल्लम हेच आता या गुन्ह्याच्या तपासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
संदीप राचंद गुंजाळ ऊर्फ डोळसे, संदीप बाळासाहेब गिऱ्हे, महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळे (सर्व रा. केडगाव) व गिऱ्हे याचा मित्र (नाव माहीत नाही) अशी चौघांनी मिळून संजय केशव कोतकर व वसंत अानंदा ठुबे यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. केडगावमधील सुवर्णनगर परिसरात ७ एप्रिलला सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडाचा घटनाक्रमही आरोपी गुंजाळ याने पोलिसांना सांगितला. गावठी कट्टे पुरवणारा आरोपी बाबासाहेब केदार यालाही अटक करण्यात आली आहे. राजकीय वादातून ही हत्या करण्यात आल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. दरम्यान, हत्याकांडानंतर पारनेर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर होत गुन्ह्याची कबुली देणारा आरोपी गुंजाळ पोलिसांची दिशाभूल करत आहे. दररोज वेगवेगळे जबाब देणाऱ्या गुंजाळने गिऱ्हे, मोकळे व आणखी एकजण गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. कोतकर यांना मी स्वत:, तर ठुबे यांना गिऱ्हे याने गोळ्या घातल्या असल्याचेही गुंजाळने कबूल केले. त्यानुसार हत्याकांडातील फरार आरोपी गिऱ्हे व मोकळे यांना शुक्रवारी रात्री अटक केली. मात्र, या हत्याकांडाशी आपला काहीच संबंध नाही, त्याच परिसरात वास्तव्याला असल्याने घटना घडल्यानंतर तेथे गेलो, असा जबाब गिऱ्हे याने प्राथमिक चौकशीत पोलिसांना दिला आहे.
गुंजाळ व गिऱ्हे यांचे विसंगत जबाब ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. आरोपी गुंजाळ याने सुरुवातीपासूनच वेगवेगळे जबाब देत पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे गुंजाळ याच्या जबाबानुसार गिऱ्हे, मोकळे व त्यांच्या मित्राचा हत्याकांडातील सहभाग, आरोपी गिऱ्हे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला, तर त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणे, तसेच फरार आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. गुंजाळ व गिऱ्हे यांच्या विसंगत जबाबांपेक्षा आरोपींचे कॉल रेकॉर्डिंग, इतर तांत्रिक तपास, तसेच फरार आरोपी विशाल कोतकर व रवी खोल्लम हेच आता या तपासाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.
विशाल कोतकरचे धागेदाेरे मिळेनात
गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले असले, तरी त्यांच्या मागील मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत. विशाल कोतकर व त्याच्या नातेवाईंकांच्या सांगण्यावरूनच आरोपींनी हा गुन्हा केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले आहेत. त्यामुळे गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल कोतकर व त्याचा सहकारी रवि खोलम हे तपासातील महत्त्वाचे दुवे ठरणार आहेत. त्यात आरोपी गुंजाळ व गिऱ्हे यांच्या विसंगत जबाबांमुळे विशाल कोतकर याला तत्काळ अटक करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. कोतकर व खोलम यांच्या अटकेसाठी पथक तयार करण्यात आले असले, तरी त्यांच्याबाबत अद्याप कोणतेच धागेदोर पोलिसांना मिळालेले नाहीत.
तांत्रिक तपास ठरणार महत्त्वाचा
आरोपी गुंजाळ याच्या जबाबानुसार चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी गुंजाळ, गिऱ्हे व मोकळे हे सध्या अटकेत आहेत. घटनेपूर्वी व घटनेनंतर आरोपींचे एकमेकांशी झालेले फोनवरील संभाषण सायबर क्राईम विगाग पडताळून पहात आहे. पोलिसांना घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे सायबर क्राईम विभागामार्फत सुरू असलेला तांत्रिक तपास महत्त्वाचा ठरणार आहे. आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडवले, याचेही धागेदोरे तांत्रिक तपासातून मिळण्याची शक्यता आहे.
आमदारांविरोधात पुरावा नाहीच
घटनेच्या दिवशी रात्री ११ च्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांच्या कोठडीत पुन्हा पाच दिवसांची (१६ एप्रिल) वाढ करण्यात आली. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींची नावे निष्पन्न झाली, आरोपींना अटकही करण्यात आली. आमदार जगताप यांच्या विरोधात मात्र पोलिसांना कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आमदार जगताप यांच्या सुटकेचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. तीन- चार दिवसांत पोलिस गुन्ह्याच्या थेट मुळापर्यंत पोहोचतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.